esakal | कोरोनामुळे झेंडू फूलाचे उत्पादन झाले कमी, नवरात्रोत्सवात भाव वधारणार
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे झेंडू फूलाचे उत्पादन झाले कमी, नवरात्रोत्सवात भाव वधारणार

जळगाव शहरात शिरसोली येथील फूल उत्पादक आठ ते दहा टन फुलांचा दररोज पुरवठा करतात. उत्सवाच्या काळात फुलांना अधिक मागणी असल्याने पुरवठाही दुप्पट होतो. 

कोरोनामुळे झेंडू फूलाचे उत्पादन झाले कमी, नवरात्रोत्सवात भाव वधारणार

sakal_logo
By
देविदास वाणी

 जळगाव  ः नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांना अधिक मागणी असते. नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस व विजयादशमीला असे दहा दिवस झेंडूला मागणी असल्याने झेंडूचे उत्पादन घेणाऱ्यांनी त्यादृष्टीने झेंडूचे उत्पादन येईल, या पद्धतीने शेती केली आहे. झेंडूला असलेली मागणी पाहता शंभर रुपये प्रतिकिलो दर नवरात्रोत्सवात मिळेल, अशी अपेक्षा फूल उत्पादक शेतकऱ्यांना आहे. 

आवश्य वाचा- खडसेंचा घटस्थापनेला राष्ट्रवादीत प्रवेश ? असे ठरलेय प्रवेशाचे सुत्र

नवरात्रोत्सवात देवीला झेंडू अधिक प्रिय असतो. यामुळे नवरात्रोत्सवात दहाही दिवस झेंडूच्या फुलांच्या माळा करून देवीला चढविल्या जातात. यामुळे झेंडूला या दिवसांत अधिक मागणी असते. नवरात्रोत्सव, दिवाळीचे दिवस फुलांच्या मागणीचे असतात. शिरसोली (ता. जळगाव) येथील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलांना मागणी असते. काही व्यापारी येथून फुले घेऊन परजिल्ह्यात फुले विकतात. जळगाव शहरात शिरसोली येथील फूल उत्पादक आठ ते दहा टन फुलांचा दररोज पुरवठा करतात. उत्सवाच्या काळात फुलांना अधिक मागणी असल्याने पुरवठाही दुप्पट होतो. 

कोरोनामुळे यंदा फूल उत्पादकांनी फूल शेतीकडे कमी लक्ष दिले आहे. फुले तोडण्यासाठी लागणारे मजूर कोरोना संसर्गामुळे येतील किंवा नाही याची शंका त्यांना आहे. यामुळे फार कमी फूल उत्पादक शेतकऱ्यांनी फुलांची शेती यंदा केली. फुले नवरात्रोत्सव व दिवाळीत बाजारात जातील या दृष्टीने फूल शेती उत्पादकांचे नियोजन असले तरी येणारे संभाव्य वादळ, पावसावर ते अवलंबून आहे. अतिवृष्टी, वादळाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असल्याने फूल उत्पादक चिंतेत आहेत. चार-पाच दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. यात अतिवृष्टी झाल्याने फुलांचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे बाजारपेठेत फुलांची आवक कमी होईल. परिणामतः फुलांचा दर वधारेल, असे चित्र आहे. 

वाचा-एरंडोल तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल 

कोरोना संसर्गामुळे यंदा फुलशेतीच्या उत्पादनावर सावट आहे. फुलांची झाडे तर लावली. मात्र आता अतिवृष्टी जर झाली तर नुकसान होईल. ऐन नवरात्रोत्सवात फुलांचे दर शंभर रुपयांपर्यंत जातील. 

समाधान पाटील,शेतकरी, शिरसोली 

संपादन- भूषण श्रीखंडे