खडसे बचावले; धावत्‍या गाडीचे फुटले टायर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 November 2020

धरणगाव व जळगावदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर धरणगाव सोडल्‍यानंतर त्यांच्या वाहनाचे टायर अचानक फुटले. टायर फुटल्‍यानंतर चालकाने गाडीवर नियंत्रण मिळवत गाडी थांबविली. 

जळगाव : राज्‍याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्‍थितीत अमळनेर येथे आयोजित कार्यक्रम आटोपून जळगावकडे परत येत असताना माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या गाडीचे टायर फुटले. वेगात असलेल्‍या गाडीचे टायर फुटले मात्र सुदैवाने कोणत्‍याही प्रकारचे नुकसान झाले नसून, यात एकनाथ खडसे बालंबाल बचावले. सदर घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धरणगाव- जळगाव महामार्गावर घडली.

अमळनेर येथे विविध विकासकामांच्या उद्‌घाटन कार्यक्रमासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आज जिल्हा दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँगे्रसेचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे देखील उपस्थित होते. दुपारी कार्यक्रम आटोपून एकनाथ खडसे त्यांच्या खासगी वाहनाने (एमएच 19 सीई 19) ने जळगावकडे परत येत होते. धरणगाव व जळगावदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर धरणगाव सोडल्‍यानंतर त्यांच्या वाहनाचे टायर अचानक फुटले. टायर फुटल्‍यानंतर चालकाने गाडीवर नियंत्रण मिळवत गाडी थांबविली. 

खडसे दुसऱ्या वाहनाने रवाना
सुदैवाने अपघातात एकनाथ खडसे हे बालंबाल बचावले. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहन जागेवरच उभे करुन खडसे दुसऱ्या वाहनाने जळगावकडे रवाना झाले. सदरची घटना माहिती पडल्‍यानंतर खडसे समर्थकांनी त्‍यांची विचारपूस करण्यासाठी फोनवरून संपर्क साधत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknath khadse car tyre blast in highway