esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadse

कारवाईच्या अफवेचे खडसेंकडूनच ‘पोस्ट मार्टम’

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ (ED)च्या रडावर असलेले माजी मंत्री एकनाथ खडसेंवर (Eknath Khadse) चौकशी, मालमत्ता जप्ती, तपासणी आदी कारवाईच्या अफवेचे बुधवारी (ता. २९) धुमशान चालले. सायंकाळी स्वत: खडसेंनीच यासंबंधी खुलासा करत अफवेचे ‘पोस्टमार्टम’ केले. दरम्यान, भोसरीतील जमीन व्यवहाराची नोंदणी करणाऱ्या तत्कालीन उपनिबंधकांना मात्र ईडीने अटक केली आहे.

हेही वाचा: मेहरूण तलाव शंभर टक्के भरला..सांडव्यावरून पाणी ‘ओव्हरफ्लो’


भोसरी (पुणे) येथील जमीन गैरव्यवहारात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंसह त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरु आहे. त्यांचे जावाई गिरीश चौधरींना अटक झाली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर खडसेंसह त्यांच्या पत्नी मंदाताई खडसेंवर दोषारोपपत्र दाखल झाले आहे.

अटकेची अफवा
प्रकरण न्यायालयात असताना बुधवारी दुपारी अचानक खडसेंना अटक झाली, जप्ती, चौकशी, तपासणी अशा कारवाईची एकच चर्चा जिल्ह्यात सुरु झाली. मुक्ताईनगरपासून जळगावपर्यंत ही चर्चा वाऱ्यासारखी पसरली. परंतु, त्याबाबत कुणीही खात्रीलायक माहिती देऊ शकत नव्हते. यादरम्यान खडसेंचा मोबाईलही लागत नसल्याने संभ्रम वाढला होता.

हेही वाचा: आता तृतीयपंथीयांनी मिळणार ओळखपत्र; पोर्टल सुरू!

खडसेंनीच केला खुलासा
दरम्यान, याबाबत सायंकाळी खडसेंनी स्वत:च खुलासा केला. ‘सकाळ’शी बोलताना ते म्हणाले, कोणतीही कारवाई अथवा चौकशी झालेली नाही. प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालयीन व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्‍वास आहे. त्यामुळे न्यायालय जो काय निर्णय देईल, तो आपण मान्य करु. आज अशाप्रकारची कोणतीही कारवाई झालेली नसताना या अफवा कोण पसरवतोय, हे सर्वानाच माहीत आहे, असे ते म्हणाले.


उपनिबंधकास कोठडी
भोसरी जमीन व्यवहारात गिरीश चौधरींच्या अटकेनंतर ईडीने जमिनीचा व्यवहार झाला तेव्हा पदावर असलेल्या तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना मंगळवारी (ता. २८) अटक केली. त्यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: जातीवाचक गावांसह वस्त्यांची नावे तातडीने बदला- जिल्हाधिकारी

दोषारोप दाखल असताना कारवाई कशी?
या संपूर्ण चर्चेदरम्यान काहींनी या प्रकरणाच्या तांत्रिक बाबींवरही बोट ठेवले. भोसरी जमीन व्यवहार प्रकरणात खडसेंसह तिघांवर दोषारोपपत्र दाखल आहे. म्हणजे हे प्रकरण न्यायालयात असून, यासंबंधी कोणतीही कारवाईची करायची झाल्यास ती न्यायालयीन आदेशानुसारच होईल. ईडीला त्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असाही मुद्दा समोर आला आहे.

loading image
go to top