फडणवीसांसोबत खडसेंची भेट भाजप की राष्‍ट्रवादीचे नेते म्‍हणून?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

येत्‍या दोन दिवसात खडसेंयाचा राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्‍याचे सांगितले जात आहे. यामुळे खडसे हे भाजपत असतील की राष्ट्रवादीमध्ये, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. 

जळगाव : भाजपवर नाराज माजी मंत्री एकनाथ खडसे पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे, खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची सुरू असताना माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी (ता. १३) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यामुळे खडसे यांची फडणवीसांसोबत होणारी भेट भाजप की राष्‍ट्रवादीचे नेते म्‍हणून होणार? याबाबत चर्चा सुरू असून याबाबत सरकारनामाने वृत्‍त दिले आहे.

माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जी. एम. फाउंडेशन संचलीत जी. एम. रुग्णालयाच्या उद्‌घाटनासाठी फडणवीस हे मंगळवारी जामनेर येथे येणार आहेत. तत्‍पुर्वी म्‍हणजे येत्‍या दोन दिवसात खडसेंयाचा राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्‍याचे सांगितले जात आहे. यामुळे खडसे हे भाजपत असतील की राष्ट्रवादीमध्ये, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. 

भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी जी. एम. फाउंडेशनच्या माध्यमातून मल्टिपर्पज हॉस्पीटल उभारले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधांनी युक्त असे हे रुग्णालय आहे. त्याचे उद्‌घाटन विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी राज्यातील काही माजी मंत्रीही उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

खडसेंची उघड भुमिका
भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. त्यांच्यावर अनेकदा उघडपणे टीका केली आहे. नाराजीमुळे ते भाजप सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. खडसेंनी फडणवीसांवर थेट निशाणा साधत आरोप केले होते. यानंतर फडणवीस हे प्रथमच जळगाव जिल्‍ह्‍यात येत असल्‍याने याबाबत चर्चा रंगत आहे.

म्‍हणूनच खडसेंच्या प्रवेशाबाबत प्रश्‍नचिन्ह
खडसे सध्या मुंबईत असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी ते शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून त्यांची भेट होऊ शकलेली नाही. परंतु ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार, हे निश्‍चित मानले जात आहे. येत्या सोमवारी (ता. १२) हा प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गुरूवारी झालेल्‍या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीस खडसे उपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा त्यांच्या पक्ष सोडण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्यात येत असल्याने तो पर्यंत खडसे भाजपत राहून व्यासपीठावर त्यांच्या सोबत बसणार की राष्ट्रवादीत जाणार? या कडेच आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknath khadse rashtrawadi congress entry and fadnvis tour jalgaon