छायाचित्र मतदारयादीचा पुनरीक्षण कार्यक्रम; नावनोंदणी करण्याची संधी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

वयाची १८ वर्षे पूर्ण झालेले नागरिक किंवा ज्यांची अद्याप मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही, असे वंचित नागरिक पदनिर्देशित ठिकाणी नमुना-६ अर्ज भरून मतदार म्हणून नोंदणी करू शकतील.

जळगाव : भारत निवडणूक आयोगामार्फत १ जानेवारी २०२१ या अर्हता तारखेवर आधारित छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. 
याअंतर्गत १७ नोव्हेंबरला जिल्ह्यातील सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२० या कालावधीत १ जानेवारी २०२१ ला वयाची १८ वर्षे पूर्ण झालेले नागरिक किंवा ज्यांची अद्याप मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही, असे वंचित नागरिक पदनिर्देशित ठिकाणी नमुना-६ अर्ज भरून मतदार म्हणून नोंदणी करू शकतील. एकापेक्षा अधिक ठिकाणी नावाची नोंद असल्यास किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित किंवा मत मतदारांचे नाव वगळण्यासाठी नमुना-७ अर्ज भरता येईल. त्याचप्रमाणे नमुना-८ अर्ज भरून आपल्या नावाच्या तपशिलामध्ये काही त्रुटी असल्यास त्यात दुरुस्ती करता येईल, अथवा नमुना-८ अ अर्ज भरून विधानसभा मतदारसंघांतर्गत आपला पत्ता बदलता येईल. याबाबतचे दावे/हरकती ५ जानेवारी २०२१ पर्यंत निकालात काढण्यात येणार असून, १५ जानेवारी २०२१ ला मतदारयादीची अंतिम प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 
 
साडेतीन हजार ‘बीएलओ’ 
यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर एकूण तीन हजार ५८७ मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्या संपर्कासाठी यादी Jalgaon.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नागरिकांना nvsp.in या संकेतस्थळावरूनदेखील विहित नमुन्यात दावे व हरकती दाखल करता येतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon election voter list revision program