जळगाव जिल्ह्यात आगामी वर्ष निवडणुकांचे !

देविदास वाणी
Saturday, 17 October 2020

जिल्हा बँक, जिल्हा परिषद, बाजार समित्या, ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता असून, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा या संस्थांवर प्रभाव आहे. त्यातच श्री. खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

जळगाव : कोरोना संसर्गामुळे जिल्हा सहकारी बँक, जिल्ह्यातील ७०० ग्रामपंचायती, बाजार समित्या, दूध संघ यांच्या पंचवार्षिक निवडणुका गेल्या सहा महिन्यांपासून रखडल्या आहेत. या निवडणुका आगामी २०२१ मध्ये घेण्याचे सूतोवाच राज्य शासनाने केले आहे. 

आवश्य वाचा- मेळघाट-अनेर संचार मार्ग प्रस्ताव लागणार मार्गी !
 

मार्च २०२० पासून कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन सुरू झाले. तब्बल सहा महिन्यांनंतर आताशी कुठे जीवन पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येतही घट होत आहे. त्यामुळे आता, जिल्ह्यातील जळगाव जिल्हा सहकारी बँक, सोसायट्या, ७०० ग्रामपंचायती, बाजार समित्यांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर शासनाने आगामी वर्षात २०२१ मध्ये निवडणुका घेण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडून माहिती मागविली असून, त्यादृष्टीने तयारी करण्यास सांगितले आहे. प्रभागरचना, आरक्षण, जागांची संख्या, कर्मचारी-अधिकारी किती लागतील, मतदान यंत्रे किती लागतील याचीही माहिती जमा करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना आता नवीन वर्ष उजाडण्याची प्रतीक्षा आहे. 

दरम्यान, येथील जिल्हा बँक, जिल्हा परिषद, बाजार समित्या, ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता असून, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा या संस्थांवर प्रभाव आहे. त्यातच श्री. खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे नवीन वर्षात श्री. खडसे राष्ट्रवादी काँग्रसमध्ये गेले, तर सहाजिकच या संस्थांमधील भाजपची सत्ता जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल, असे राजकीयतज्ज्ञांना वाटते. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon elections in jalgaon district during the corona period will be held next year