राजकीय पक्षांचे मोर्चे आणि दुसरीकडे जनता वेठीला !

सचिन जोशी
Tuesday, 10 November 2020

रास्ता रोकोने महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली. दोन्ही बाजूंकडे दोन-तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

जळगाव : भाजपने शेतकऱ्यांचे विविध प्रश्‍न व मागण्यांसाठी किसान मोर्चा काढला. रास्ता रोको आंदोलनही केले, तर कॉँग्रेसने केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध ट्रॅक्टर रॅली काढत आपल्या भावनांना वाट करून दिली; परंतु राजकीय पक्षांच्या या आंदोलनांमुळे जळगावकर जनता वेठीस धरली गेली. भाजपच्या रास्ता रोकोने महामार्ग ठप्प केला, तर काँग्रेसच्या ट्रॅक्टर रॅलीमुळे शहरातील वाहतूक प्रभावित झाली. 

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मोर्चाची धडक दिली, तर काँग्रेसनेही केंद्र सरकारने पारित केलेली कृषी विधेयके व अन्य निर्णयांविरोधात ट्रॅक्टर रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. जामनेरकडून येणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे अजिंठा चौफुली ते रेमंड चौक यादरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. 

 

रास्ता रोकोने महामार्ग ठप्प 
महाजनांच्या नेतृत्वातील भाजपच्या शेतकऱ्यांसाठीच्या या आंदोलनाकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. त्यामुळे आंदोलनाला जास्तीत जास्त लोक कसे येतील, याची व्यवस्था करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, भाषणे केल्यानंतर भाजपने आकाशवाणी चौकात महामार्गावर रास्ता रोको केला. या रास्ता रोकोने महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली. दोन्ही बाजूंकडे दोन-तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काव्यरत्नावली चौकातून येणारी व शहरातून महाबळकडे व इच्छादेवी चौकाकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. 

काँग्रेसचाही ट्रॅक्टर मोर्चा 
काँग्रेसतर्फेही सोमवारी (ता. ९) जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. दुपारी काँग्रेस भवनापासून मोर्चास सुरवात होणार होती. त्यासाठी ३०-४० ट्रॅक्टर फुले मार्केटसमोरून काँग्रेस भवनाजवळ एकत्रित झाले, त्यामुळे याआधीच वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. नंतर हे ट्रॅक्टर मार्गस्थ होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोचले. त्यादरम्यानही विविध प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित झाली. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon entire traffic jam in Jalgaon city was caused by the rallies of political parties