उद्योजकांनी स्थानीकांना प्राधान्याने रोजगार द्यावा- मंत्री पाटील 

देविदास वाणी
Friday, 20 November 2020

रोजगारासाठी जिल्ह्यात मोठे उद्योग आले पाहिजे, जे उद्योग आहेत ते चांगल्या प्रकारे चालले पाहिजेत. नवउद्योजकांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

जळगाव ः उद्योजकांनी आपल्या उद्योगात स्थानिक बेरोजगारांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करुन द्यावे. जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यकता भासल्यास उद्योगमंत्र्यांकडे बैठक आयोजित करू असे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिले. औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यास सर्व संबंधित विभागांनी प्राधान्य द्यावे. असे निर्देशही त्यांनी दिले. 

आवश्य वाचा- खोदकाम करतांना सापडली जूनी नाणी आणि गावात पसरली अफवा !
 

येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा सल्लागार समिती, जिल्हास्तरीय स्थानिक लोकांना रोजगार समिती, जिल्हास्तरीय आजारी उद्योग पुनरुज्जीवन समिती सभा, जिल्हास्तरीय निर्यात प्रचालन समितीची सभा झाली. यावेळी ते बोलत होते. 

आमदार चंदुलाल पटेल, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आदी उपस्थित होते. 

आवर्जून वाचा- अरे बापरे अचानक एवढा कापूस आला कुठून;  कुर्‍हे कापूस केंद्रावर रातोरात वाहनांच्या रांगा !

युवकांना स्वयंरोजगाराकडे वळवा 
पालकमंत्री पाटील म्हणाले की, जिल्ह्याचा आर्थिक विकास होण्यासाठी बेरोजगारांच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. रोजगारासाठी जिल्ह्यात मोठे उद्योग आले पाहिजे, जे उद्योग आहेत ते चांगल्या प्रकारे चालले पाहिजेत. नवउद्योजकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. याकरीता त्यांना आवश्यक असलेल्या रस्ते, वीज व पाणी या मुलभूत, पायाभूत सुविधा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महापालिका, विद्युत वितरण कंपनीने तातडीने उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. याकरीता सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ते नियोजन करावे. उद्योजकांच्या अडचणी सोडविताना त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. युवकांना उद्योग व रोजगाराचे प्रशिक्षण देण्यात यावेत. त्यांना प्रशिक्षित करुन स्वयंरोजगाराकडे वळवावे. 
 

उद्योजकांनी मांडल्या समस्या 
बैठकीत दि. इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडिस्ट्रीज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्युत वितरण कंपनी विद्युत भार कमी करणे, अतिरिक्त लावलेले मागणी शुल्क परत न देणे, वीज ग्राहकाची वर्गवारी बदलल्यानंतर फरकाची रक्कम परत न मिळणे, वीज जोडणी वेळेत न मिळणे, लघु उद्योग भारती संघटनेतर्फे औद्योगिक वसाहतीमधील बंद पथदिवे सुरु करणे, काशिनाथ हॉटेलकडून एम सेक्टरकडे जाणेसाठी रस्ता बनविणे, औद्योगिक वसाहतीत पाण्याच्या निचरा होण्यासाठी गटारी बांधणे, औरंगाबाद महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे आदी समस्यांचा पाढाच मांडला. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Entrepreneurs should give priority to locals