शेतकऱ्यांची भिस्त पांढऱ्या सोन्यावरच ! 

मिलिंद वानखेडे
Friday, 7 August 2020

कोरोनामुळे कापसाची निर्यात बंद होती. तर सीसीआयसह शासनाने इतर माध्यमातून खरेदी केंद्र सुरू ठेवली होती.

भुसावळ : गत वर्षी अतिवृष्टीमुळे ज्वारी व मका पिकांची दाणादाण उडाली. त्यामुळे या वर्षी ज्वारी व मकाच्या पेऱ्यात घट झाली, तर खरेदीअभावी शेतकऱ्यांच्या घरात अद्यापही कापूस पडून आहे. तरीही कपाशीच्या पेऱ्यात वाढ झाली असून, १५ हजार ९५१ हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला आहे. 

गत वर्षी दिवाळीपर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे ज्वारी व मका पिकांना जमिनीवरच कोंब आले होते. दोन्ही पिके मातीमोल झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे यंदा पाठ फिरवली, तर कपाशीबाबत निसर्गाकडून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, पेरणीपासून तर वेचणीपर्यंतचा खर्चाचा विचार करता शेतकऱ्यांना फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्यात कोरोनामुळे कापसाची निर्यात बंद होती. तर सीसीआयसह शासनाने इतर माध्यमातून खरेदी केंद्र सुरू ठेवली होती.

बाजार समित्यांनी लोभासाठी शेतकऱ्यांची नोंदणी फोनवर केली. मात्र, व्यापाऱ्यांनाच दोन हजार रुपयेप्रमाणे टोकनची सर्रास विक्री केल्यामुळे सीसीआय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांपेक्षा व्‍यापाऱ्यांच्या मालालाच संधी मिळाली. शेतकऱ्यांचा नंबर लागला, तरी क्विंटलला तीन ते चार किलो कपात, तिसरा-चौथा ग्रेट लावून शेतकऱ्यांना अक्षरशः धुऊन काढण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अवघ्या साडेचार हजार रुपये क्विंटलप्रमाणे व्यापाऱ्यांना कापूस विकला. तर फर्दडचा भाव तीन हजार रुपये लावण्यात आला.

शेतकऱ्यांची अक्षरशः लूट झाली. त्यात अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. तरीही शेतकऱ्यांचा ‘पांढरे सोने’ म्हणून असलेल्या कपाशीवर भरवसा असल्याने कपाशीच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. या वर्षी ज्वारी व मक्याच्या सरासरी पेरणीत घट झाली असून, उडीद, मूग या कडधान्याच्‍याही क्षेत्रात वाढ झाली आहे. 

पीकलागवड हेक्टरमध्ये 
ज्वारी - दोन हजार ६५१ 
मका - एक हजार ८६६ 
मूग - ८९३ 
उडीद - एक हजार ५० 
सोयाबीन - दोन हजार ३८३ 
कापूस - १५ हजार ९५१ 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon farmers corp by cotton dipende increase in urad, green gram, soybean