अखेर सांगलीचे अभिजित राऊतच  जळगावचे नवे जिल्हाधिकारी; कोरोनातील अपयशात डॉ. ढाकणेंची "विकेट'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020


जळगावात महसूल स्तरावर आणि आता कोविड संसर्गाच्या काळात चांगली सेवा देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. जनतेने सहकार्य केले, सर्वांचे आभार. 
- डॉ. अविनाश ढाकणे
 

जळगाव : जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील वृद्धेच्या शौचालयातील मृत्यू प्रकरणात अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या निलंबनापाठोपाठ एकूणच कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनातील अपयशात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचीही "विकेट' गेली आहे. त्यांच्या जागी सांगली जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची नियुक्ती झाली आहे. दोन दिवसांपासून अभिजित राऊत यांच्या नावाची चर्चा होती. आज अखेर शिक्‍कामोर्तब झाला आहे. 

दोन वर्षांपूर्वी जळगावात दाखल झालेल्या जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांची खरेतर सुरवातीला कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळख होती. सोलापूरला महापालिका आयुक्त असताना मंत्र्याचा अतिक्रमित बंगला पाडण्याचे आदेश देणारा खमक्‍या अधिकारी म्हणून त्यांनी लौकिक मिळविला होता. मात्र, दोन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संसर्ग रोखण्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये डॉ. ढाकणे कमी पडल्याची भावना जनमानसात निर्माण झाली. त्यातच गेल्या बुधवारी (ता. 10) कोविड रुग्णालयातील शौचालयात बाधित वृद्धेचा मृतदेह आढळून आल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण देशभरात गाजले. शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह तीन डॉक्‍टरांवर निलंबनाची कारवाई झाली. तर पाच जणांविरोधात गुन्हाही दाखल झाला.

स्थिती हाताळण्यात अपयश 
हे संपूर्ण प्रकरण आरोग्य यंत्रणेशी संबंधित असताना कोरोना संसर्गाची जळगाव जिल्ह्यातील एकूणच स्थिती हाताळताना डॉ. ढाकणे यांना अपयश आल्याचे मानले जात असून त्यांच्याविरोधात स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांपर्यंतही तक्रारी केल्या आहेत. सोशल मीडियावर जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांच्या बदलीची मागणी जोर धरु लागली असताना डॉ. ढाकणे यांच्या बदलीचे आदेश आले. 

राऊत मूळचे अकोल्याचे 
डॉ. अविनाश ढाकणे यांच्या जागी सांगली जिल्हापरिषदेचे सीईओ अभिजित राऊत यांची नियुक्ती झाली आहे. श्री. राऊत मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण मात्र बुलडाण्यात झाले. 2013 च्या बॅचचे आयएएस असलेले राऊत तरुण व संयमी स्वभावाचे अशी त्यांची ओळख आहे. परिविक्षाधीन कालावधीत त्यांनी नंदुरबार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली असून, सांगली जिल्हा परिषदेत सीईओ म्हणून अडीच वर्षांपासून ते सेवारत आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Finally, Abhijit Raut of Sangli is the new Collector of Jalgaon; In the failure of the corona, Dr. Dhakne's "wicket"