esakal | वर्षातील पहिले सुर्यग्रहण रविवारी; जळगावात कशी असेल स्थिती...
sakal

बोलून बातमी शोधा

Solar eclipse

चंद्राच्या गडद सावलीचा मार्ग उत्तर भारतातील राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातील काही शहरांमधून जाणार आहे, त्यामुळे त्यांना पूर्ण कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळेल. तर उर्वरित भारत मात्र चंद्राच्या विरळ सावलीत असल्याने हे ग्रहण कमी-अधिक प्रमाणात खंडग्रास स्वरूपातच दिसणार आहे. 

वर्षातील पहिले सुर्यग्रहण रविवारी; जळगावात कशी असेल स्थिती...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : आकाशात घडणाऱ्या नैसर्गिक चमत्कारांपैकी एक म्हणजे सूर्यग्रहण. येत्या 21 जूनला वर्षातल्या सगळ्यात मोठ्या दिवशी हा दुर्मिळ योग बघण्याची संधी दुसऱ्यांदा मिळणार आहे. या आधी डिसेंबर 26 डिसेंबर 2019 ला ही संधी मिळाली होती. 
21 जूनला ग्रहणाची सुरवात सकाळी पाच वाजून 40 मिनिटांनी मध्य आफ्रिकेतून होईल आणि शेवट सायंकाळी 6 वाजून 31 मिनिटांनी फिलिपिन्स येथे होईल. भारतात सूर्याग्रहणाची सुरवात 10 वाजता होईल. पण चंद्राच्या गडद सावलीचा मार्ग उत्तर भारतातील राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातील काही शहरांमधून जाणार आहे, त्यामुळे त्यांना पूर्ण कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळेल. तर उर्वरित भारत मात्र चंद्राच्या विरळ सावलीत असल्याने हे ग्रहण कमी-अधिक प्रमाणात खंडग्रास स्वरूपातच दिसणार आहे. 
 
जळगावमध्ये 66 टक्के दिसेल 
जळगावमधून हे ग्रहण खंडग्रास स्वरूपात म्हणजे 66 टक्केच दिसणार आहे. ग्रहणाला सकाळी 10 वाजून 8 मिनिटांनी सुरू होईल. दुपारी 11 वाजून 49 मिनिटांनी चंद्राने सूर्याला 66 टक्के झाकलेले असेल. त्यानंतर ग्रहण सुटायला सुरवात होईल. दुपारी 1 वाजून 39 मिनिटांनी ग्रहण संपेल. खंडग्रास सूर्यग्रहणाचा संपूर्ण काळ 3 तास 31 मिनिटांचा असेल. 
 
घरात बसूनच घ्या अनुभूती 
यावेळी लॉकडाउनमुळे कार्यक्रमाचे आयोजन करणे शक्‍य नसल्याने जळगाव खगोलप्रेमी ग्रुपच्या वतीने या खंडग्रास सूर्यग्रहणाच्या अद्‌भुत सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण गुगल मीटवर करणार आहोत. सर्वांनी कोणतेही समज-गैरसमज मनात न ठेवता या दुर्मिळ खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा आणि त्यामागचे विज्ञान समजून घ्यावे, असे आवाहन अभ्यासक अमोघ जोशी यांनी केले आहे.