
लग्नानंतर जेठ प्रदीप जोशी खेाटेनाटे सांगत पती-पत्नीत भांडणे लावत असल्याने एकत्र कुटुंबात वाद होत असल्याने स्वाती आणि योगेश यांनी महाबळ कॉलनीत भाडेतत्त्वावर घर घेऊन ते तेथे वास्तव्यास आहेत.
जळगाव : महाविद्यालयीन मित्रासोबतचा फोटो मोबाईलमध्ये आढळून आल्याने संशयी पतीने मोठ्या भावाच्या मदतीने पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीला मारहाण करून तिचा गळा दाबून उशिने नाकतोंड दाबत ठार करण्याचा प्रयत्न केला. मरणासन्न अवस्थेत असलेल्या विवाहितेवर चार दिवसांपासून उपचार सुरू असून, तिने दिलेल्या जबाबावरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.
तहसील कार्यालातील रेशन विभागात कंत्राटी पद्धतीवर कार्यरत योगेश जोशी याच्या सोबत गेल्या वर्षीच १० फेब्रुवारीला स्वाती यांचा विवाह झाला. लग्नानंतर जेठ प्रदीप जोशी खेाटेनाटे सांगत पती-पत्नीत भांडणे लावत असल्याने एकत्र कुटुंबात वाद होत असल्याने स्वाती आणि योगेश यांनी महाबळ कॉलनीत भाडेतत्त्वावर घर घेऊन ते तेथे वास्तव्यास आहेत. वेगळे राहत असतानाही सासरच्या मंडळींचा त्रास कमी झाला नसून पतीसह जेठाने ठार करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मोबाईलमधील फोटोमुळे वाद
पती योगेश जोशी याने स्वातीचा मोबाईल तपासला असता त्यात स्वातीचे मित्रासोबतचे फोटो आढळले. त्यावरून वादाला सुरवात झाली. मंगळवारी (ता. ८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पती योगेश व जेठ प्रदीप यांनी लाथाबुक्क्यांनी स्वातीला बेदम मारहाण केली. मारहाण करताना गळा दाबल्यानंतर तोंडावर उशी ठेवून श्वाससोच्छवास बंद होईपर्यंत मारहाण केली. स्वाती बेशुद्ध पडल्याने तिला सेाडून दिल्यावर तिने घरातून पळून शेजाऱ्यांकडे आसरा घेतला. तेथेही पती व जेठाने धाव घेत स्वातीला उचलून आणत असताना आरडाओरड केल्याने देाघांनी तिला सोडून पळ काढला.
रुग्णालयात दाखल
शेजारच्या महिलेच्या मोबाईलवरून स्वातीने मामा माणिक जोशी यांना कळवले. कुटुंबीयांनी तत्काळ धाव घेत स्वातीला खासगी रुग्णालयात दाखल केले. चार दिवसांपासून बेशुद्धावस्थेत तिच्यावर उपचार सुरू असल्याने पोलिस जबाब नोंदवू शकले नाही. आज स्वाती शुद्धीवर आल्यानंतर घटनेची इत्यंभूत माहिती पोलिसांना दिल्यावरून पती योगेश जोशी, जेठ प्रदीप जोशी अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
संपादन ः राजेश सोनवणे