अहो आश्‍चर्यम्...पितृपक्षानंतरही सोन्याची चमक फिकी; गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी

मिलिंद वानखेडे
Sunday, 27 September 2020

सध्या सुरू असलेल्या अधिक मासात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यातच मागील दोन-तीन दिवसांत दुसऱ्यांदा सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. दिवाळीचा सणही जवळ येऊन ठेपल्याने सुवर्ण बाजारात चैतन्याचे वातावरण आहे. सोने-चांदीचे भाव कमी झाल्याने गुंतवणूकदारांचा कलही खरेदीकडे वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे सध्या सोने बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे.

पितृपक्षात सोने खरेदी अनिष्ट मानली जाते. त्यामुळे मागणी अन् दरांत घसरण होते, असा आजवरचा समज आहे. त्यामुळे सुवर्णबाजारात सोने खरेदीसाठी पितृपक्षानंतर उसळी पाहायला मिळते. यंदा मात्र हे चित्र काहिसे बदललेले दिसते. जागतिक पातळीवरील अस्थिरता, कमॉडिटी बाजारातील घसरण, कोरोनाचा इफेक्ट आणि भारत- चीन तणावाची स्थिती, याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाला असून, पितृपक्षानंतरही सोन्याची चमक अद्याप फिकी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोने खरेदीची चांगली संधी मिळाली आहे. सोन्याचा आजचा (ता. २७) भाव प्रतितोळा ५० हजार ३००, तर चांदी प्रतिकिलो ५९ हजार ५०० रुपयांचा भाव आहे. 
 

सोन्या- चांदीच्या दरात चढ- उतार

सोन्या- चांदीच्या दरात गेल्या पंधरा दिवसांत कमालीचा चढ- उतार दिसून आला. गुंतवणूकदारांना सोन्याच्या भावाने रविवारी (ता. २७) पुन्हा सुखद धक्का दिला. सोने प्रतितोळा ५० हजार ३००, तर जीएसटीसह ५१ हजार ८०० रुपयांना विकले गेले. मागणीत घट झाल्याने सोने स्वस्त झाले आहे. सोने दर गेल्या पंधरा दिवसांत अडीच हजार रुपयांनी घसरला, तर चांदीचा दर किलोमागे तब्बल चौदा हजार रुपयांनी खाली आला. सोने १० ग्रॅमला ५०,३०० रुपये, तर चांदीचा भावही घसरून तो प्रतिकिलो ५९,५०० रुपये तर जीएसटीसह ६१ हजार २८५ पर्यंत पोहोचला आहे.  
 

पितृपक्षानंतर सोने-चांदीच्या भावात झालेली घसरण 

तारीख---सोन्याचे भाव--चांदीचे भाव 
१६-----५१,६००-----६६,००० 
१७-----५१,५००-----६५,००० 
१८------५१,१००----६५,००० 
१९-----५२,१००-----६५,००० 
२०-----५१,१००-----६५,००० 
२१-----५१,८००-----६८,००० 
२२-----५१,०००-----६१,००० 
२३-----५०,७००-----६०,००० 
२४------५०,२००-----५८,००० 
२५-----५०,३००------६०,००० 
२६-----५०,३००------५९,५०० 
२७-----५०,३००------५९,५००


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Gold and silver prices continue to fall