पालकमंत्री पाटील यांनी भाजपचे माजी आमदार पुत्राला दिला ‘कानमंत्र’ 

सचिन जोशी
Wednesday, 25 November 2020

पक्षावर नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. दुर्दैवाने याच क्षेत्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊंचेही निधन झाले.

जळगाव : यावल तालुक्यातीलच बोरावल येथे नुकत्याच आयोजित एका कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल यांनी हजेरी लावली. या अराजकीय कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी अमोल यांना काही कानमंत्र दिल्याची चर्चा असून, त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, हा मंत्र नेमका कोणता, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. 

वाचा- बांधकाम क्षेत्राला संजीवनी देणारा निर्णय 

भाजप-शिवसेनेतील विळ्या-भोपळ्याचे नाते अख्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. दोघा पक्षांमधून विस्तवही जात नसताना यावल तालुक्यात मात्र भाजप-सेना पदाधिकाऱ्यांचे ‘तुझ्या गळा- माझ्या गळा’ सुरू असल्याचे चित्र आहे. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत हे दोघेही पक्ष एकत्र आहेत. जिल्ह्यात, राज्यात कुठेही युती नसताना यावल तालुक्यात सातत्याने दोन्ही पक्ष एकत्र राहिल्याचा अनुभव आहे. माजी आमदार (कै.) हरिभाऊ जावळे व यावल तालुक्यातील सेना पदाधिकाऱ्यांनी हे नातं टिकवून ठेवलं आहे. याच नात्यातून गेल्या आठवड्यात पालकमंत्र्यांचा बाजार समितीत छोटेखानी सत्कार करण्यात आला. सत्काराला दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार असताना काँग्रेस- राष्ट्रवादीचा एकही पदाधिकारी हजर नव्हता. 

अमोल जावळेंची उपस्थिती 
या सत्कारानंतर बोरावल येथे धनगर समाजाच्या सभागृहाचे भूमिपूजन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी भाजपचे पदाधिकारी कुणी हजर नसताना जावळे यांचे पुत्र अमोल हे उपस्थित राहिलेत व ते पालकमंत्र्यांसोबत व्यासपीठावर होते. बोरावल व परिसरातील पाच-सात गावांमध्ये हरिभाऊ जावळे यांना मानणारा मोठा वर्ग असून, त्यांनी अमोल यांना आवर्जून याठिकाणी व्यासपीठावर स्थान दिले. या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात, विशेषत: भाजपत जोरदार चर्चा सुरू आहे. 

 

हेही वाचा- राज्यपालांनी खडसेंना दिल्या यशाच्या सदिच्छा -

भाजपला सूचक इशारा 
पक्षावर नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. दुर्दैवाने याच क्षेत्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊंचेही निधन झाले, त्यामुळे पक्षात या भागात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यातून भाजपने कुठलाही धडा घेतल्याचे दिसत नाही. खडसे आता पक्षात नसताना हरिभाऊ जावळे समर्थक कार्यकर्त्यांनाही पक्षाकडून डावलले जात असल्याची भावना आहे. अशा स्थितीत सहानुभूती असलेल्या अमोल यांच्याशी गुलाबराव पाटील विशिष्ट हेतूने जवळीक साधत असतील, तर तो भाजपसाठी सूचक इशारा मानला जात आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon guardian minister patil's tips given to the son of a former BJP MLA