तापीचे ६२ टीएमसी पाणी गुजरातला 

देविदास वाणी
Wednesday, 19 August 2020

विदर्भातील वाहत येणारी पूर्णा नदी तापीला मुक्ताईनगर तालुक्यातील मेहूण-चांगदेव संगमावर मिळते. त्यामुळे तापीच्या पाण्यात प्रचंड वाढ होते.

जळगाव  : अर्ध्या जळगाव जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या हतनूर (ता. भुसावळ) धरणातून यंदा आतापर्यंत सुमारे एक हजार ७५२ दशलक्ष घनमीटर (६२ टीएमसी) पाणी तापी नदीतून गुजरातला सोडण्यात आले आहे. हतनूर धरणाचे तब्बल ९४ वेळा दरवाजे उघडून बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८४ टक्के पाऊस झाल्याने मोठ्या धरणासह मध्यम प्रकल्पात चांगला साठा झाला आहे. 

जिल्ह्यात १० ऑगस्टपासून संततधार सुरू आहे. सोबतच विदर्भ व मध्य प्रदेशातही पाऊस सुरू आहे. विदर्भातील वाहत येणारी पूर्णा नदी तापीला मुक्ताईनगर तालुक्यातील मेहूण-चांगदेव संगमावर मिळते. त्यामुळे तापीच्या पाण्यात प्रचंड वाढ होते. सध्या तेच सुरू आहे. मध्य प्रदेशातून येणाऱ्या तापी नदीतून येणारे पाणी हतनूर धरणात अडविले जाते. 

अधिक गाळामुळे विसर्ग 
धरणाची पाणी साठवणक्षमता ३८८ एमएम क्यूब एवढी आहे. त्यापेक्षा अधिक पाणी साठविले जाऊ शकत नाही. शिवाय हतनूर धरणात ६० टक्क्यांपेक्षा अधिक गाळाचे प्रमाण असल्याने धरण लगेच ‘ओव्हरफ्लो’ होण्याचा धोका असतो. परिणामतः धरण भरण्याच्या अगोदरच, पावसाचा अंदाज घेत विसर्ग करण्यात येतो. धरणाला एकूण ४२ दरवाजे आहेत. त्यांपैकी ३६ दरवाजे आतापर्यंत ९४ वेळा पाणी सोडण्यासाठी उघडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत या प्रकल्पातून ६२ टीएमसी पाणी सोडण्यात आले. धरणाची क्षमता अधिक असती तर पाणी धरणातच साठविले असते. सोबतच धरणाला डावा कालवाही नाही. उजवा कालवा आहे. त्याद्वारे यावल, रावेर, सावदा, फैजपूर या तालुक्यांतील गावांना पाणीपुरवठा केला जातो. 

जळगाव जिल्ह्यातील मोठ्या धरणांतील साठा 
धरण------टक्केवारी 
हतनूर--२५.८० 
गिरणा--५५.४० 
वाघूर--९१.६१ 

धुळे : प्रकल्पातील साठा (टक्के) 
पांझरा …..७८.७० 
मालनगाव….९९.९८ 
जामखेडी…...१०० 
अनेर ……..४०.५३ 
अक्कलपाडा - ४२.७४ 
वाडीशेवाडी - ९२.३९ 
सुलवाडे ….२३.२४ 

नंदुरबार : मध्यम प्रकल्पातील साठा 
विरचक ---७६ टक्के 
दरा………७३ 
नागन……..६९ 
कोरडी…….७६ 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Hatnur Dam gates of were opened ninety fore times