esakal | फागणे-तरसोद टप्प्याच्या मक्तेदारास "टर्मिनेशन नोटीस' 
sakal

बोलून बातमी शोधा

highway fourway fagne tarsod

फागणे-तरसोद टप्प्यातील कामाला पाठपुरावा केल्यानंतरही बराच विलंब झाला आहे. या कामाला गती देण्याची कोणतीही हालचाल दिसत नाही. त्यामुळे कामाचा मक्ता टर्मिनेट करण्याबाबत मक्तेदारास नोटीस बजावली आहे. 
-सी. एम. सिन्हा, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 

फागणे-तरसोद टप्प्याच्या मक्तेदारास "टर्मिनेशन नोटीस' 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : एकावेळी सुरू होऊनही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील तरसोद-चिखली टप्प्यातील चौपदरीकरण 70 टक्के पूर्ण होत असताना, फागणे-तरसोद टप्प्यातील काम अद्याप 15 टक्केही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या टप्प्यातील काम करणाऱ्या अग्रोह इन्फ्रास्ट्रक्‍चर या मक्तेदार एजन्सीला मक्ता टर्मिनेट करण्याची नोटीस बजावली आहे. याबाबत कार्यादेश दिल्यापासून काम संथगतीने सुरू होते. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही मक्तेदार एजन्सीने या कामाला गती दिली नाही. त्यामुळे आता ही नोटीस बजावून एजन्सीचे उत्तर मागविले आहे. 
मुंबई-कोलकता या भल्यामोठ्या टप्प्यात सहापेक्षा अधिक राज्यांचा दुवा म्हणून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ओळखला जातो. गुजरात-महाराष्ट्राला जोडणाऱ्या या मार्गाच्या नवापूर-अमरावती टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम 2012 पासून प्रलंबित आहे. सुरवातीला एल ऍन्ड टी कंपनीला मक्ता देण्यात आला. मात्र, तो रद्द झाला. नंतर तीन टप्प्यांत विभागून तीन वेगवेगळ्या निविदांद्वारे तीन एजन्सींना काम देण्यात आले. 

फागणे-तरसोद टप्प्याला ग्रहण 
या तीन टप्प्यांत फागणे-तरसोद, तरसोद-चिखली व पुढे चिखली-अमरावती यांचा समावेश आहे. पैकी फागणे-तरसोद व तरसोद-चिखली हे दोन टप्पे धुळे, जळगाव जिल्ह्यातील. त्यात तरसोद-चिखली या 84 किलोमीटरच्या टप्प्याचे काम वेल्स्पनला दिले असून, ते जवळपास 70 टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाले आहे. फागणे-तरसोदला दोन वर्षांपासून लागलेले ग्रहण अद्याप मिटलेले नाही. हे काम अग्रोह इन्फ्रास्ट्रक्‍चरला दिले असून, केवळ 15 टक्केच काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले आहे. कामाची मुदत मार्च 2021 असून, वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही या कामाला गती मिळालेली नाही. 

सुरवात आधी, तरीही संथ 
चिखली-तरसोद टप्प्याच्या कामाआधी फागणे-तरसोद टप्प्याचे काम सुरू झाले. सुरवातीला चार-सहा महिन्यांत सपाटीकरण, मुरूम टाकणे वेगात सुरू झाले होते. नंतर हे काम थंड बस्त्यात गेले. त्यानंतर आजपर्यंत या कामाला गती मिळाली नाही. सहा महिन्यांपूर्वी कामाला गती देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो हव्या त्या प्रमाणात नव्हता. मार्चच्या 24 तारखेपासून तर लॉकडाउनच सुरू झाले. त्यामुळे हे काम पूर्णपणे ठप्प झाले. सध्या काम सुरू असले, तरी अगदीच नगण्य स्वरूपात आहे. 

मक्तेदाराला नोटीस 
कामाला होणारा विलंब लक्षात घेता लोकप्रतिनिधींसोबत मक्तेदार एजन्सीच्या प्रतिनिधीची अनेकदा बैठक झाली. महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सी. एम. सिन्हा यांनीही पाठपुरावा केला. मात्र, कामात सुधारणा झाली नाही. अखेरीस मक्तेदार एजन्सीला मक्ता "टर्मिनेट' करण्याची नोटीस बजावली असून, महिनाभरात उत्तर मागविले आहे. 
 

loading image