‘पॉलिमर’इंडस्ट्रीत ७० टक्के प्लॅस्टिकचा पुनर्वापर; पर्यावरण संवर्धनासही हातभार  

‘पॉलिमर’इंडस्ट्रीत ७० टक्के प्लॅस्टिकचा पुनर्वापर; पर्यावरण संवर्धनासही हातभार  

जळगाव  : प्लॅस्टिक वापराने होणारे प्रचंड प्रदूषण, त्यातून पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम सर्वश्रुत आहेच. त्यामुळे एकीकडे प्लॅस्टिक वापरावर बंदी, प्लॅस्टिकमुक्त अभियानाचा जागर होत असताना इकडे जळगाव एमआयडीसीतील ‘पॉलिमर’ इंडस्ट्रीने अगदी सुरवातीपासूनच प्लॅस्टिकच्या पुनर्वापरावर भर देत आदर्श घालून दिलाय. शिवाय, पर्यावरण संवर्धनात मोलाचा वाटाही ही इंडस्ट्री उचलत आहे. उत्पादनात वापरात येणाऱ्या कच्च्या मालात जवळपास ७० टक्के प्लॅस्टिक पुनर्वापर ही इंडस्ट्री करत आहे. 

जळगाव शहराची सुवर्णबाजारासह केळी, कापूस पिकांचा जिल्हा अशी ओळख असली तरी जळगावची चटई, पीव्हीसी पाइप व ठिबक ही ‘पॉलिमर’ इंडस्ट्रीही देशभरात विख्यात आहे. या तिन्ही उद्योगांत कच्चा माल म्हणून प्लॅस्टिकचा वापर होतो. तिन्ही उद्योगांतील उत्पादनासाठी पुनर्वापरात येणारे प्लॅस्टिक, उत्पादनाचे स्क्रॅब आदी कच्चा माल वापरला जातो. काही प्रमाणात व्हर्जिनही वापरले जाते. यापैकी व्हर्जिन हे अत्यंत अल्प प्रमाणात वापरले जाते. उर्वरित कच्चा माल पूर्णपणे प्लॅस्टिक, स्क्रॅबच्या स्वरूपात असतो. 

७० टक्के प्लॅस्टिकचा पुनर्वापर 
चटईचे उत्पादन घेण्यासाठी स्क्रॅब प्लॅस्टिक, अन्य प्लॅस्टिक स्वरूपातील कच्चा माल लागतो. तसेच व्हर्जिन मटेरिअलही लागते. हे मटेरिअल फ्रेश प्लॅस्टिक असते. स्क्रॅब, पुनर्वापरातील प्लॅस्टिकमधून ग्रॅनील्स, पीपी बनवून ते चटईच्या उत्पादनात वापरले जाते. पीव्हीसी पाइपासाठी लागणारा कच्चा माल याच स्वरूपातील पुनर्वापरातील प्लॅस्टिक असतो, त्यातून पावडर बनवून पाइपनिर्मिती होते. ठिबकच्या नळ्यांसाठीही वापरलेल्या नळ्यांचे स्क्रॅबच जास्त प्रमाणात कच्चा माल म्हणून वापरले जाते. जवळपास ७० टक्के प्लॅस्टिकचा असा पुनर्वापर केला जात आहे. 

पर्यावरण संवर्धनाचे काम 
प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम राज्य, देशच नव्हे तर सारे जग अनुभवतेय. त्यामुळे जगभरात प्लॅस्टिकमुक्तीबाबत आवाहन केले जात आहे. भारतातही त्याचा जागर सुरू असून, ‘सिंगल यूज’ प्लॅस्टिक बंदीसह अन्य पर्याय अवलंबले जात आहेत. मात्र, जळगावच्या पॉलिमर इंडस्ट्रीत ७० टक्क्यांपेक्षा अधिक प्लॅस्टिकचा पुनर्वापर होत असल्याने पर्यावरण संवर्धनात आपसूकच महत्त्वाचे योगदान ही इंडस्ट्री देत आहे. 

असा होतोय पुनर्वापर (दररोज) 
चटई उद्योगासाठी : २५० टन 
ठिबक उद्योगासाठी : ४० टन 
पीव्हीसी पाइपासाठी : १५० टन 
एकूण पुनर्वापर : सुमारे ४५० ते ५०० टन 


संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com