esakal | बंधारा फोडण्यापर्यंत वाळूचोरट्यांची मजल!
sakal

बोलून बातमी शोधा

Sand thief

बंधारा फोडण्यापर्यंत वाळूचोरट्यांची मजल!

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

जळगाव ः वाळूचोरट्यांची (Sand thief) ब्रिटिशकालीन बंधारा ( British Dam ) फोडण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यांनी कोळपिंप्री (ता. पारोळा) शिवारात हा कारनामा केला. त्यामुळे संतप्त ग्रामपंचायत (Gram Panchayat) सदस्यांनी पारोळ्याचे तहसीलदार गवांदे यांना निवेदन दिले, तसेच (Parola Police) पोलिस निरीक्षक भंडारे यांच्याशी या घटनेबाबत चर्चा करून वाळूचोरट्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात आता दररोज १ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट


कोळपिंप्री शिवारात बोरी नदीवर ब्रिटिशकालीन बंधारा आहे. या नदीपात्रासह शिवारात वाळू चोरट्यांकडून अवैध उत्खनन व वाहतूक केली जाते. त्यास वेळोवेळी अटकावाचा प्रयत्न कोळपिंप्री ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केला. त्यावर शक्कल लढवून वाळू चोरट्यांनी थेट बोरी नदीवरील ब्रिटिशकालीन बंधाराच खालून फोडला. त्याला भगदाड पाडले. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाळू भगडादातून बाहेर पडत ती अमळनेर शिवारातील नदीपात्रात खोलगट भागात जमा होत आहे. तेथून तिची वाहतूक करणे वाळू चोरट्यांना सोयीचे ठरत आहे. कोळपिंप्रीची हद्द सोडून वाळू चोरली जात असल्याने ग्रामस्थांचाही आता त्रास होणार नाही, अशी चोरट्यांची भूमिका असावी.चोरट्यांचा पर्यावरणाला धक्का
वाळू चोरट्यांनी ब्रिटिशकालीन बंधारा फोडल्याने ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य भडकले. वाळू चोरट्यांच्या या गैरकृत्यामुळे कोळपिंप्री हद्दीतील बोरी नदीला धोका निर्माण झाला आहे. गावाच्या पाणीपुरवठ्याची विहीर याच नदीपात्रात आहे. सततच्या वाळूचोरीमुळे पाणीपातळी घटून पर्यावरणीय समतोलालाही चोरट्यांकडून धक्का दिला जात आहे. त्याचा पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होण्याचा गंभीर प्रकार घडत आहे. टंचाईचा प्रश्‍न निर्माण केला जात आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आणि ब्रिटिशकालीन बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी कोळपिंप्रीचे उपसरपंच शशिकांत काटे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद काटे, सुनील काटे, दीपक काटे, महेश काटे, सतीश काटे, दत्तू काटे, महेंद्र भिल, प्रदीप काटे यांनी तहसीलदार गवांदे यांच्याकडे धाव घेतली. त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. वाळूचोरी रोखण्याबाबत सहकार्याची ग्वाही तहसीलदारांनी दिली. नंतर ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने पारोळ्याचे पोलिस निरीक्षक भंडारे यांच्याशी चर्चा करत त्यांना वाळू चोरट्यांच्या गैरउद्योगाची माहिती दिली व त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

हेही वाचा: अट्टलगुन्हेगाराने सख्या बहिणीच्या घरावर मारला ‘डाका’..

शेवटी स्वखर्चाने बंधारा दुरुस्ती
यंदा अत्यल्प पाऊस, त्यात चोरट्यांकडून वाळूचोरीसाठी बंधारा फोडल्याने गावाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. नदीपात्रातील विहिरीची पातळी घटून टंचाईची स्थिती निर्माण होऊन ग्रामस्थांचे हाल होऊ शकतात. तसे घडू नये, म्हणून कोळपिंप्री ग्रामपंचायतीने स्वखर्चातून चोरट्यांनी फोडलेल्या बंधाऱ्याची दुरुस्ती करून घेतली. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

loading image
go to top