
जळगाव जिल्ह्यात आता दररोज १ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट
जळगाव : कोरानाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात लसीकरणाला (Corona Vaccination) वेग आला असून बुधवारी एकाच दिवशी तब्बल ७७ हजार ५१३ नागरिकांना कोरोना लशीचे डोस देण्यात आले. पुढच्या टप्प्यात दररोज एक लाख लसीकरणाचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्याला प्राप्त झालेल्या लसीच्या मात्रेनुसार आतापर्यंत १४ लाख ७ हजार १६३ लाभार्थ्यांना कोरोना लशीचे डोस देण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पहिल्या लाटेनंतर आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार लसीकरण करण्यात येत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस महत्वपूर्ण असल्याने जिल्ह्यात लसीकरणावर भर देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनाला दर तीन/चार दिवसानंतर लशीची पुरेशी मात्रा उपलब्ध होत आहे. त्यानुसार दर दिवशी प्रत्येक केंद्रावर हजारो नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.
ऑगस्टमध्ये पावणेदोन लाख डोस
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात लसीकरणास गती मिळाली असून ऑगस्ट महिन्यातच पावणे दोन लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लशीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत प्राप्त झालेल्या लशीच्या मात्रेनुसार शहरी भागात ६ लाख ३४ हजार ५५२ तर ग्रामीण पातळीवर ७ लाख ७२ हजार ६११ असे एकूण १४ लाख ७ हजार १६३ लाभार्थ्यांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. विशेषत: शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात १ लाख ३८ हजारांहून अधिक संख्येने लसीकरण झाले आहे.
प्रतिदिन एक लाखाचे उद्दिष्ट्य
सद्य: स्थितीत संसर्ग साखळी खंडीत झाली असून जिल्ह्यात ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटचे रुग्ण देखील पूर्णपणे बरे झालेले आहेत. आगामी काळात संसर्ग वाढू नये अथवा संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी जिल्ह्याला जास्तीत जास्त लशीचा पुरवठा वाढविण्याची मागणी केली आहे. त्यानुसार पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत असून लसीच्या उपलब्धतेनुसार दर दिवशी प्रत्येक केंद्रावर १ हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.
लशीचा पुरवठा याचप्रमाणे प्राप्त झाल्यास प्रतिदिन १ लाख लसीकरणाचे प्रशासनाने उद्दिष्ट आहे. पुढील दोन ते अडीच महिन्यांत जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करु शकू.
- अजिजित राऊत, जिल्हाधिकारी
लशीचा पुरवठा नियमित याच प्रमाणात अखंड राहिल्यास लसीकरणाला गती मिळून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे शक्य होणार आहे.
- डॉ. बी. टी. जमादार
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्ह्यात ४ नवे रुग्ण
गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या पाचच्या आतच नोंदली जात आहे. गुरुवारी जिल्ह्यात नवे ४ रुग्ण आढळून आले. पैकी ३ भुसावळ तर १ मुक्ताईनगर तालुक्यातील आहे. दिवसभरात ४ रुग्ण कोरोनातून बरेही झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या आता केवळ २१ असून केवळ ३ रुग्णांमध्ये लक्षणे आहेत.