
राज्य सरकार, राज्याचा गृह विभाग मात्र कोणतीही कारवाई तातडीने करायला तयार नाही. राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे.
जळगाव : जिल्ह्यात वारंवार महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यात पोलिसांचा धाक संपला आहे का? असा संतप्त प्रश्न खासदार रक्षा खडसे यांनी थेट मुख्यमंत्री व राज्याच्या गृहमंत्र्यांनाच केला आहे.
वाचा- केळी पीकविमाप्रश्नी खासदार निष्क्रिय; आमदारांवर आरोप का ?
जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यात मंगळवारी वीस वर्षीय तरुणीवर गुंगीचे औषध देऊन चौघांनी अत्याचार केला आणि त्यानंतर तिला विष पाजून बेशुद्धावस्थेत फेकून दिले. पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण समाजमन सुन्न झाले असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.
सततच्या घटना गंभीर
गेल्या महिन्यात १४ ऑक्टोबरला भुसावळ तालुक्यातील वांजोळा गावात पाच वर्षाच्या मूकबधिर मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला. रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे एका तरुणीवर अत्याचार करून तिच्यासह चार भावंडांची अत्यंत निर्घृण हत्त्या करण्यात आली. असे असताना राज्य सरकार, राज्याचा गृह विभाग मात्र कोणतीही कारवाई तातडीने करायला तयार नाही.
राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. महिलांचे जीवन असुरक्षित झाले आहे. महाराष्ट्र राज्यात स्त्रियांना निर्भयपणे जगता यायला पाहिजे. महिलांचा सन्मान आणि सुरक्षा झालीच पाहिजे अशी मागणी रक्षाई खडसे यांनी पत्राद्वारे केली आहे.
या केल्या सूचना
या पीडितांच्या कुटुंबियांना दिलासा तर नाही देता येणार परंतु हे अत्यंत घृणास्पद कृत्य असून, या नराधमांना भरचौकात फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. या सर्व घटनांचा तपास पोलिसांनी नि:पक्षपातीपणे करावा. तपासात कोणत्याही तांत्रिक बाबींची उणीव राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करुन दोषीवर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. आरोपपत्र एका आठवड्यात दाखल व्हावे आणि खटला दोन महिन्यात संपवण्यात यावा. गरज पडल्यास ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना श्रीमती खडसेंनी केल्या आहेत.
संपादन- भूषण श्रीखंडे