कर्जाच्या नावाने ३१२ जण फसले; त्‍याने लुटले १६ लाख

रईस शेख
Sunday, 29 November 2020

नोकरीवरील कर्मचाऱ्यांनी कर्ज हवे असलेल्या ३१२ जणांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये घेतले आणि ते व्यवस्थापक पंकज पाटील यांच्याकडे जमा केले. यावर आशिष जामेकरने याने फाइल तयार करीत त्यावर कर्ज मिळाल्याचा शिक्का मारून त्याच्या पावत्या तयार केल्या आहेत.

जळगाव : फायनान्स कंपनीत नोकरीवरील कर्मचारी, तसेच कर्ज मंजूर करण्यासाठी कर्जदारांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये घेत त्यांना कर्ज न देता १६ लाख ६६ हजारांत फसवणूक झाली आहे. याप्रकरणी संस्थेचे आशिष जामेकर (रा. वर्धा), व्यवस्थापक पंकज पाटील (रा. वावडे, ता. अमळनेर) व प्रशासन विभागाच्या अश्विनी दांडी (रा. वर्धा) यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. 
शहरातील हरिविठ्ठलनगरातील खंडेराव महाले (वय २८) याच्यासह जितेंद्र काळे (रा. शिवाजीनगर), संतोष पजई (रा. जुना खेडी रोड), दीपक महाजन (रा. भुसावळ), गजानन शिसोदे (रा. पारोळा), नीता पाटील (रा. पारोळा) व धनश्री बडगुजर (रा. अमळनेर) यांना संशयितांनी लक्ष्मी फायनान्शियल सर्व्हिसेस, नागपूर या संस्थेच्या नावाने जळगावात नोकरीचे नियुक्तिपत्र देत दरमहा १५ हजार रुपये पगार देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार हे सर्व जण या फायनान्स कंपनीत नोकरी करीत होते. कर्ज प्रकरण मंजूर करून घेण्यासाठीच्या सेवा व मार्गदर्शन आवश्यकता असणाऱ्या गरजू लोकांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये वसूल करण्याच्या सूचना त्यांना दिल्या होत्या. काम करवून घेत सात कर्मचाऱ्यांना पगारही दिलेला नाही. 

३१२ कर्जदारांना गंडवले. 
नोकरीवरील कर्मचाऱ्यांनी कर्ज हवे असलेल्या ३१२ जणांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये घेतले आणि ते व्यवस्थापक पंकज पाटील यांच्याकडे जमा केले. यावर आशिष जामेकरने याने फाइल तयार करीत त्यावर कर्ज मिळाल्याचा शिक्का मारून त्याच्या पावत्या तयार केल्या आहेत. तसेच यावर जळगावच्या कार्यालयाचा पत्ता रामानंदनगर बस थांब्याच्या मागे, हनुमान मंदिर रोड, असा नमूद केला आहे. 

सात नोकरांसह ३१२ जणांनी फसवणूक 
खंडेराव महालेने ६९ सभासदांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये घेऊन ते कार्यालयात जमा केले आहेत. जितेंद्र काळे यांनी ३८ जणांची रक्कम व ११ महिन्यांचा पगार, संतोष पजई यांचे ६६ सभासद व ११ महिन्यांचा पगार, दीपक महाजन यांचे १९ सभासद व पाच महिन्यांचा पगार, गजानन शिसोदे यांचे ३० सभासद व चार महिन्यांचा पगार, नीता पाटील यांचे ९० सभासद व तीन महिन्यांचा पगार व धनश्री पाटील यांचे ३० सभासद व चार महिन्यांचा पगार अशी एकूण सर्व १६ लाख ६६ हजार ९९० रुपयांची फसवणूक झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon loan process and 16 lakh fraud