रोज ४० लाखांच्या गुटख्याची बिनबोभाट आवक 

रईस शेख
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

शहरात आणि जिल्ह्यात कुठल्याही पानटपरीवर सहज गुटखा मिळेल. दहा रुपये किंमत असलेली पुडी लॉकडाउनच्या काळात १०० च्या आकड्यापर्यंत पेाचली होती. तर दहा रुपयांच्या तंबाखूची ३५ रुपयांना विक्री झाली.

जळगाव : राज्यात २०१२ पासून गुटखाबंदी लागू आहे; पण अगदी लॉकडाउन काळातील स्थितीचे विश्‍लेषण केले, तर दिवसाला दोन कंटेनर महणजे सुमारे ४० लाखांचा माल रोज उतरतो. जवळपास १२- १५ कोटींची महिन्याची उलाढाल या धंद्यात होत असेल, तर गुटखाबंदी कागदावरच आहे, असेच म्हणावे लागेल. केवळ मालजप्तीचे अधिकार असलेल्या अन्न- औषध प्रशासनाच्या मर्यादा यामुळे उघड होत आहेत. 
शहरात आणि जिल्ह्यात कुठल्याही पानटपरीवर सहज गुटखा मिळेल. दहा रुपये किंमत असलेली पुडी लॉकडाउनच्या काळात १०० च्या आकड्यापर्यंत पेाचली होती. तर दहा रुपयांच्या तंबाखूची ३५ रुपयांना विक्री झाली. शासनाने बंदी आणलेला आणि शरीरास अपायकारक असा गुटखाविक्रीचा धंदा जळगावसह राज्यात बिनबोभाट सुरू आहे. 

तासाभरात दोन ट्रक खाली 
जळगावात रोज दोन कंटेनर (ट्रक) गुटखा येतो. एका ट्रकमध्ये २० याप्रमाणे ४०- ४५ हजारांचा माल. कमी- अधिक प्रमाण गृहित धरले, तरी महिन्याला २४ कोटींवर गुटख्याची आवक होते. हा सगळा माल गुजरात, मध्य प्रदेश आणि गुटख्याचे केंद्र असलेल्या हैदराबादहून येतो. साधारण २४ तासांत एक ट्रक ५५० किलोमीटरचे अंतर कापून जळगाव धडकतात. शहरापासून लांब निर्जन ग्रामीण भागात कंटेनर थांबवून लहान पॅकबंद वाहने हा माल पोलिस ठाण्याच्या आर्थिक हमीवर लोड-अनलेाड करतात. 

असे होते वितरण 
पिक-अप व्हॅन, पॅजो रिक्षांनी हव्या त्या ठिकाणी हा माल पोचवला जातेा. उर्वरित माल शहरापासून जवळच्या गावखेड्यातील गुदामात ठेवला जातो. जळगाव तालुक्यात नशिराबाद, म्हसावद, पाळधी, धरणगाव, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव, औरंगाबाद जिल्‍ह्यात फर्दापूर आदी ठिकाणे गुटखा खाली करण्याची व ती साठवण्याची केंद्रे आहेत. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व पोलिसांच्या माहितीची आहेत, असा दावाही केला जातो. 
 
...म्हणून चालकांची अदलाबदल 
मागणी असलेल्या शहरापर्यंत गुटखा पुरवण्याची जबाबदारी ही काही विशिष्ट एजंटची असते. वितरणाच्या प्रवासात काही कारवाई झाली, तर ज्याने ऑर्डर दिली आहे त्याचे नुकसान होणार नाही, हे नुकसान उत्पादक वा पुरवठा एजंटचे असेल. कारवाई झाली तरी पुढच्या काही दिवसांत गुटखा त्यांना त्या शहरातील त्यांच्या एजंटपर्यंत पोचवायचा असतो. त्यामुळे गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकचे चालक दोनदा बदलले जातात. वेळेच्या आत माल पोचवणाऱ्या चालकाला दोन हजारांपासून पाच हजारांपर्यंत बक्षीसही मिळते. परिणामी, वाहतुकीची माहिती गुप्त राहाते. 
 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon madhya pradesh daily gutkha import