खानदेशात १५ लाख वीजग्राहकांचा महावितरणाला शॉक 

राजेश सोनवणे
Friday, 17 July 2020

खानदेशात वीजपुरवठ्याचे काम महावितरण करत आहे. विजेची मागणी व वीजपुरवठा आणि खरेदी केली जाणारी वीज यातील ताळमेळ बसणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. विजेतील ‘लाइन लॉस’ वाढण्यास थकीत बिलाची रक्‍कम हेदेखील प्रमुख कारण असून, यामुळे भारनियमनाचा ताण पडत असतो.

जळगाव : ‘महावितरण’कडून होणाऱ्या विजेचा वापर झाल्‍यानंतर त्‍याचे बिल भरण्याकडे दुर्लक्ष होत असते. थकीत बिलाची रक्‍कम वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबवूनदेखील वीजग्राहकांकडील थकीत बिलाची रक्‍कम वाढतच असून, वसुलीत महावितरणदेखील थकले आहे. यात कृषिपंप ग्राहकांकडील थकबाकीची रक्‍कम मोठी असून, जळगाव परिमंडळातील जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांत कृषिपंपांची थकबाकी चार हजार ७४१ कोटींच्यावर पोचली आहे. दरम्यान, सर्व मिळून १४ लाख ७५ हजार ९८७ ग्राहकांनी बिल न भरल्याची माहिती पुढे आली आहे. 
खानदेशात वीजपुरवठ्याचे काम महावितरण करत आहे. विजेची मागणी व वीजपुरवठा आणि खरेदी केली जाणारी वीज यातील ताळमेळ बसणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. विजेतील ‘लाइन लॉस’ वाढण्यास थकीत बिलाची रक्‍कम हेदेखील प्रमुख कारण असून, यामुळे भारनियमनाचा ताण पडत असतो. ग्राहकांकडे थकणाऱ्या बिलाची वसुली ‘महावितरण’कडून पुरेशी होत नाही. अनेकदा विशेष मोहीम राबवून, थकबाकीदारांचे कनेक्‍शन कापून करण्यात आलेले प्रयत्‍नदेखील तोकडे पडत आहेत. यामुळे वसुलीकडे दुर्लक्ष होत असल्‍याने थकबाकीची रक्‍कम वाढतीच राहिली आहे. यात आता कोरोनामुळे उद्‌भवलेल्‍या महामारीत लॉकडाउन पुकारण्यात आला. या कालावधीत बिल वसुली सक्‍तीची करण्यात आली नसल्‍याने थकबाकी वाढण्यात त्‍याचा खूप मोठा परिणाम जाणवू लागला आहे. 
महावितरणचे जळगाव परिमंडळ अर्थात खानदेशात जूनअखेरपर्यंत थकीत बिलाची रक्‍कम खूप मोठी आहे, जी वसूल करण्यात महावितरणला नाकेनऊ येणार आहे. खानदेशात घरगुती, कृषी, वाणिज्‍यिक, औद्योगिक, पाणीपुरवठा, पथदीप आणि इतर मिळून साधारण १४ लाख ७५ हजार ९८७ ग्राहक असे आहेत, त्‍यांनी बिल भरण्याचे काम केलेले नाही. या ग्राहकांकडे तब्‍बल पाच हजार ४७१ कोटी १० लाख ८७ हजार रुपयांची थकबाकी झाली आहे. 

कृषीची आघाडी 
महावितरणच्या जळगाव परिमंडळात तिन्ही जिल्ह्यांतील तीन लाख ४१ हजार ७४३ कृषिपंपांची चार हजार ७४१ कोटींची थकबाकी झाली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात एक लाख ९९ हजार २९५ कृषिपंपांची दोन हजार ९३८ कोटींवर, तर धुळे जिल्ह्यात ९० हजार ८१५ कृषिपंपांची एक हजार ११९ कोटी आणि नंदुरबार जिल्ह्यात ५१ हजार ५५३ कृषिपंपांची ६८३ कोटी रुपये थकबाकी आहे. 

मंडळ.........बिल न भरणारे ग्राहक.......................थकबाकी 

जळगाव...८ लाख ५२ हजार २७३......३२७९ कोटी १४ लाख ७३ हजार 
धुळे.......३ लाख ९८ हजार १२७......१३११ कोटी १७ लाख ५० हजार 
नंदुरबार...२ लाख २० हजार ६८७......८८० कोटी ७८ लाख ६४ हजार 
एकूण....१४ लाख ७१ हजार ८७.......५७७१ कोटी १० लाख ८७ हजार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mahavitaran 15 lakh costmer khandesh divison bill pending