मध्य रेल्वेची तिकीट दलालांविरोधात मोठी कारवाई; १७४ गुन्हे दाखल 

चेतन चौधरी 
Monday, 7 December 2020

रेल्वे मालमत्तेचे संरक्षण करण्याव्यतिरिक्त ‘कोविड’चा संसर्ग रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकांमार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

भुसावळ  : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या संरक्षण दलाने (आरपीएफ) छापासत्र सुरू केले असून, या कारवाईत आतापर्यंत तब्बल १७४ दलालांवर कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार असून, प्रवाशांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष दिले जात असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

वाचा- राज्यात २१३ लाख टन उसाचे गाळप; खानदेशात प्रारंभ 

लॉकडाउन आणि त्यानंतर अनलॉक कालावधीत रेल्वेने विशेष गाड्या वर्गीकृत पद्धतीने चालविण्यास सुरवात केली आहे. या विशेष गाड्यांमध्ये वैयक्तिक ओळखपत्र (आयडी) वापरून आरक्षण करणे आणि आरक्षित जागा बळकावण्यासाठी ई-तिकिटांच्या तक्रारी प्राप्त होण्यास सुरवात झाली. त्यामुळे तिकीट दलालांविरुद्ध मोहीम तीव्र केली असून, मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने तातडीने कारवाई देखील सुरू केली आहे. 

दलालीचे १७४ गुन्हे 
सायबर सेलकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे व इतर स्त्रोत वापरून छापासत्र राबविले जात आहे. मध्य रेल्वेच्या पाचही विभागांत हे छापे टाकण्यात आले. त्यातील बहुतांश खासगी प्रवासी एजन्सींच्या आवारात होते. नोव्हेंबर २०२० पर्यंत रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये तिकीट दलालीचे १७४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

‘कोविड’साठी उपाययोजना 
रेल्वे मालमत्तेचे संरक्षण करण्याव्यतिरिक्त ‘कोविड’चा संसर्ग रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकांमार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मास्क वापरणे आणि शारीरिक अंतर राखणे यासारख्या नियमांचे पालन करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचे नियमन आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

युद्धपातळीवर मदत 
रेल्वेस्थानकांवर आढळून येणाऱ्या अल्पवयीन मुलांची सुटका करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोचविणे, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना रेल्वेमध्ये चढण्यास मदत करणे, वेळेवर वैद्यकीय साहाय्य आणि अर्भकांसाठी दुधाची व्यवस्था करून देणे, तसेच गर्भवती महिलांना डब्यात चढण्यास मदत करणे, अंमली पदार्थ, मद्य वगैरे जप्त करून गुन्हेगारांवर नजर ठेवणे आदी मदतकार्यही आरपीएफ पथकांमार्फत केले जात आहे.

 वाचा- बीएचआर’च्या गटारात सारे हात माखलेले ! 

महिलांसाठी 'मेरी सहेली' 
महिला प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास व्हावा, यासाठी मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकामार्फत ‘मेरी सहेली’ उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत आरपीएफचे पथक दैनिक व साप्ताहिक विशेष गाड्यांसह सरासरी २५ गाड्यांमधून पेट्रोलिंग करतात. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon major action against central railway ticket brokers