खडसेंसारख्या कार्यकर्त्यांच्या योगदानामुळेच पक्षाला आज ‘अच्छे दिन’ 

सचिन जोशी
Thursday, 10 September 2020

खडसेंना त्यांच्या जीवनात अनेक संघर्ष, संकटांना तोंड द्यावे लागले. व्यक्तिगत स्तरावर अनेक संकटांवर त्यांनी सक्षमपणे मात केली.

जळगाव  : फार पूर्वीपासून आम्ही खडसेंसोबत राज्यात पक्षाचे काम करीत आलो आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या सोबतीने त्यावेळच्या प्रतिकूल स्थितीत आम्ही राज्यात पक्षाची उभारणी केली. पक्षाला आज जे चांगले दिवस आलेत, ते खडसेंसारख्या कार्यकर्त्यांच्या योगदानाचे फलित आहे, असे गौरवोदगार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. 

प्रा. सुनील नेवे लिखित ‘जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचे प्रकाशन आज गडकरींनी नागपूरहोऊन ऑनलाइन पद्धतीने सहभागी होत केले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चंद्रपूरहून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, भोकरदनहून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे औरंगाबादहून सहभागी झाले होते. 

संबधीत बातमी ः मला फडणवीसांनी त्रास देलाय, मी मुळीच स्वस्थ बसणार नाही !
 

पुस्तक प्रकाशनाचा प्रत्यक्ष कार्यक्रम मुक्ताईनगरात खडसेंच्या फार्म हाऊस परिसरात झाला. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, खडसेंना त्यांच्या जीवनात अनेक संघर्ष, संकटांना तोंड द्यावे लागले. व्यक्तिगत स्तरावर अनेक संकटांवर त्यांनी सक्षमपणे मात केली. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचे पक्षाच्या उभारणीत योगदान आहे. नाथाभाऊ माझ्यापेक्षा मोठे आहेत, मात्र ते शतायुषी व्हावेत, असे गडकरी म्हणाले. 

 

ना अहंकार, ना गर्व : मुनगंटीवार 
यावेळी चंद्रपूरहून बोलताना मुनगंटीवार म्हणाले, कार्यकर्त्यांवर भावाप्रमाणे प्रेम करणारा नेता म्हणून खडसेंची ओळख आहे. विरोधी पक्षात असताना त्यांनी तत्कालीन सरकारवर केलेले आरोप, टीका हे त्यांचे शब्द नव्हते, तर बाण होते. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांमुळे त्यांनी अनेक जनहिताचे निर्णय घेण्यास त्या-त्या सरकारला भाग पाडले. ते विरोधी पक्षनेते असताना अनेकदा त्यांच्या निवासस्थानी बैठका होत. पण, प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या घरी गेलो असता ते खुर्चीवरुन उठून मला त्या खुर्चीवरची जागा देत, एवढे ते मोठे आहेत. ना कुठला अहंकार, ना गर्व असे त्यांचे व्यक्तिमत्व. रावसाहेब दानवे व हरिभाऊ बागडे यांनीही मनोगत व्यक्त खडसेंनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Minister Nitin Gadkari said that today is a good day for the party due to activists like Eknathrao Khadse.