esakal | मुख्यमंत्र्याविषयी अपशब्‍द...भाजप आमदार चव्हाणांच्या प्रतिमेस फासले काळे
sakal

बोलून बातमी शोधा

mangesh chavan

मंगेश चव्हाण हे चाळीसगाव येथील भाजपचे आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रथमच चाळीसगाव मतदार संघातून उमेदवारी दिली असून भरघोस मतांनी विजयी झाले. अवघे एकतीस वर्षे वयाचे ते सर्वात तरूण आमदार आहेत. त्‍यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्‍या अपशब्‍दाचे पडसाद उमटले असून शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले.

मुख्यमंत्र्याविषयी अपशब्‍द...भाजप आमदार चव्हाणांच्या प्रतिमेस फासले काळे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : चाळीसगाव मतदार संघातील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत अपशब्दाचा वापर केला. याचा निषेध म्‍हणून शिवसेनेतर्फे मोर्चा काढत आमदार चव्हाण यांच्या प्रतिमेस काळे आले. तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. 
विधानसभेच्या चाळीसगाव मतदार संघातील भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना संबोधून ‘रिकामटेकडा मुख्यमंत्री’ असा उल्लेख केला. शनिवारी राज्‍यात भाजपकडून करण्यात आलेल्‍या आंदोलनाप्रमाणे चाळीसगाव येथे दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात बोलतांना त्यांनी मुख्यमंत्र्यांविषयी उल्लेख केला. भाजपच्या आमदाराकडून मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयी केलेल्‍या शब्‍दप्रयोगामुळे शिवसेना संतप्त झाली असून आमदार चव्हाण निषेध करण्यात आला आहे. 

आमदार चव्हाणांचे असे होते वक्‍तव्य 
मुख्यमंत्री पदावर जी व्यक्ती असते, तीला एक मिनीटही फुरसत नसते. मात्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे भरपूर वेळ आहे. ते मुंबई- पुणे अडीच तासाचा प्रवास स्वत: गाडी चालवून करीत असतात. एवढा रिकामचोट मुख्यमंत्री इतिहासात पहावयास मिळाला नाही. 

जळगावात फासले काळे
शिवसेनेच्यावतीने जळगावात देखील निषेध करण्यात आला. शिवसेना कार्यालयाजवळ शहर शिवसेनेतर्फे आमदार चव्हाण यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारण्यात आले. यावेळी शहर प्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्‍या आंदोलनात माजी महापौर विष्णू भंगाळे, शहर संघटक दिनेश जगताप, गणेश गायकवाड, विजय बांदल, शिवसेना महिला आघाडी महानगरप्रमुख शोभा चौधरी आदि उपस्थित होते. 

चाळीसगाव, मुक्‍ताईनगरातही निषेध
चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते तहसीलदार कार्यालयापर्यत मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले. दरम्‍यान आमदार चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. शिवसेनाप्रमुख गुलाबराव वाघ, चाळीसगाव शिवसेना प्रमुख रमेश चव्हाण यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. तर मुक्‍ताईनगर येथे देखील आंदोलन झाले. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल गैरवक्तव्य करणाऱ्या आमदार चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी; अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल; असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी तालुकाप्रमुख छोटू भोई, ॲड. मनोहर खैरनार, शहरप्रमुख गणेश टोंगे आदी उपस्‍थित होते.
 

loading image