फडणवीस यांच्यावरील द्वेषापोटी चुकीचे रिपोर्ट : डॉ. सुभाष भामरे

कैलास शिंदे
Monday, 30 November 2020

या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकविण्यातही हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे आज मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलेले नाही. 

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात जलयुक्तची चांगली कामे झाली आहेत. मात्र, फडणवीस यांच्याबाबतच्या व्यक्तिगत द्वेषापोटी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ‘कॅग’चा चुकीचा अहवाल सादर करून बदनामी करण्यात येत आहे, असा आरोप माजी सरंक्षण राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्षे पूर्ण झाले आहे. त्या संदर्भात सरकारचे अपयश जनतेसमोर आणण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर पत्रकार परिषद घेण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने जळगाव जिल्ह्याचे प्रभारी म्हणून खासदार डॉ. भामरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपस्थित होते. डॉ. भामरे म्हणाले, की वर्षभरात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोणतेही विकासाचे काम केलेले नाही. केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम या सरकारने केले. ‘कोविड’शी सामना करण्यातही राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकविण्यातही हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे आज मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलेले नाही. 

शेतकरी समाधानी
जलयुक्त शिवाराबाबत ते म्हणाले, की फडणवीस सरकारने ही योजना राबविल्यामुळे राज्यातील तब्बल २२ हजार खेड्यांत सिंचन झाले. त्यामुळे आज शेतकरी समाधानी आहे. मात्र, केवळ फडणवीस यांचा द्वेष असल्याने महाविकास आघाडी सरकारने ‘कॅग’च्या माध्यमातून चुकीचे अहवाल सादर करून त्यांच्यावर आरोप केले आहेत. वर्षभरात या सरकारने केवळ स्थगिती देण्याचेच काम केले आहे. त्यामुळे हे महाविकास नव्हे, तर महास्थगिती सरकार आहे, असा आरोपही त्यांनी केला. 
 
सोमय्यांची उत्तरे द्या; अन्यथा गुन्हा दाखल करा 
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे यांच्यावर भूखंड प्रकरणी आरोप केले आहेत, असे सांगून डॉ. भामरे म्हणाले, की मुख्यमंत्री ठाकरे यांनी किरीट सोमय्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत किंवा जर ते खोटे असतील, तर सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करावा. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mp subhash bhamre statement in jalyukt shivar work on fadanvis goverment