अमळनेरची मानसी पाटील उपजिल्हाधिकारी; राज्यात द्वितीय 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

"ग्रामीण विद्यार्थी तसेच शहरी विद्यार्थी शिकावा तसेच सर्वाना गुणवत्ता पूर्ण मार्गदर्शन मिळावे यासाठी दीपस्तंभचे कार्य अविरत सुरू आहे. त्याचे सार्थक झाले असे वाटते. मानसी आणि पूनम, रुपाली यांनी युवतींसमोर आदर्श निर्माण केला आहे. 
- डॉ. किरण देसले, संचालक, दीपस्तंभ.

जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून यात अमळनेर तालुक्‍यातील जवखेडा या गावाची विद्यार्थिनी मानसी सुरेश पाटील हिने उपजिल्हाधिकारी पदासाठी राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेत दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्राच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. यामध्ये मानसी पाटील हिने राज्यातून द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच दीपस्तंभ गुरुकुल प्रकल्पात शिष्यवृत्ती परीक्षेत शिकणारी विद्यार्थिनी पिंपळगाव खुर्द (ता. भुसावळ) येथील पूनम राणे हिची उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड झाली आहे. तिला 490 गुण मिळाले आहेत. तर धुळे येथील रुपाली गजानन शिरोळे हिची औद्योगिक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. ती "सकाळ'चे उपमुख्य संपादक प्रशांत कोतकर यांची भगिनी आहे. तर जळगाव येथील जीवन मोराणकर यांची तहसीलदार पदी निवड झाली आहे. ते सध्या नंदुरबार येथे उपशिक्षणाधिकारी आहेत. संगमनेर येथील अल्फा मिलिंद देशमुख यांनी उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे. 

मानसी विक्रीकर निरीक्षक म्हणून कार्यरत 
मानसी पाटील हि सध्या विक्रीकर निरीक्षक पदावर कार्यरत आहे. बांभोरी इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.ई. कॉम्प्युटर पदवी घेतल्यानंतर मानसीने दीपस्तंभ फाउंडेशन येथे तयारी सुरू केली. मानसीचे वडील निवृत्त प्राथमिक शिक्षक असून आई गृहिणी आहे. मानसीच्या यशाने अमळनेर तालुक्‍यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

पुनमचा संघर्ष 
पूनम राणे हिचा संघर्ष मुलींसाठी प्रेरणादायी आहे. फार्मसीच्या अंतिम वर्षाला असताना पूनमचे पितृछत्र हरपले. आई व दोन भावांनी अल्पशेतीच्या आधारावर पूनमचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2018 मध्ये दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाभियान अंतर्गत प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन गुरुकुल प्रकल्पात निशुल्क प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळविला. या दोनही विद्यार्थिनींनी पूर्व, मुख्य, मुलाखत या तिन्ही टप्प्याचे मार्गदर्शन दीपस्तंभ येथे घेतले आहे. यशाचे श्रेय यशवंतांनी आई- वडील आणि दीपस्तंभ परिवाराला दिले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mpsc exam result manasi patil deputy collector selection