तोंडाला मास्क का लावला नाही... केली विचारणा आणि खावा लागला मार ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

अचानक पाच ते सहा जण येऊन कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून कुणाल बारसे आणि मुकादम पेंडवाल यांना मारहाण केली.

जळगाव  : महापालिकेतर्फे शहरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी उपायुक्त समतानगरात गेले होते. यावेळी पाहणी करीत असताना उपायुक्तांनी एकाला मास्क लावण्याबाबत सांगितले असता त्याचा राग येऊन चार ते पाच जणांचे टोळके त्यांच्या अंगावर धावून गेले. तसेच आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. यात सफाई कर्मचारी जखमी झाले असून, याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नक्की वाचा : देशभरातील ४१ आयुध निर्माणीतून ८२ हजार कर्मचाऱ्यांनी ‘लंच बॉयकॉट’
 

महापालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व मुख्य व उपनाल्यांची सफाईची मोहीम हाती घेतली जाते. त्यानुसार गेल्या वीस दिवसांपासून शहरातील नालेसफाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यात गुरुवारपासून समतानगर येथील नाल्यांची सफाई सुरू केली आहे. आज सकाळी आरोग्य विभागाचे उपायुक्त पवन पाटील, आरोग्य निरीक्षक बडगुजर, एस. आय. कुणाल बारसे आणि मुकादम उज्ज्वल पेंडवाल कामाची पाहणी करीत होते. यावेळी एक जण तोंडाला मास्क, रुमाल न लावता फिरत होता. यावेळी उपायुक्तांनी तोंडाला रुमाल, मास्क लावण्याचे सांगितल्याचा राग या व्यक्तीला आला आणि त्याने उपायुक्त यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना दमदाटी तसेच शिवीगाळ केला. त्यानंतर अचानक पाच ते सहा जण येऊन कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून कुणाल बारसे आणि मुकादम पेंडवाल यांना मारहाण केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात हल्लेखोरांवर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. 

आर्वजून वाचा  : संकट आले...खानदेशात येथे झालाय टोळधाडीचा प्रवेश 
 

तीन जणांवर गुन्हा दाखल 
विनामास्क फिरणाऱ्यांना उपायुक्तांनी सांगितल्याचा राग आल्याने अनुप सोपान पानपाटील (वय 29, रा. बौद्धवाडा), आकाश बुधा झनके (रा. समतानगर), शुभम अनिल पाठक (रा. समतानगर) यांच्यासह दोन ते तीन जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात महापालिका आरोग्य निरीक्षक कुणाल राजेश बारसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

क्‍लिक कराः  अमळनेर पालिकेच्या दवाखान्या समोर आगंणवाडी सेविकांचा ठिय्या ! 

तीन दिवसात दुसरा हल्ला 
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर बुधवारी बोहरा गल्ली परिसरात हॉकर्सने हल्ला केला होता. यात एक कर्मचारी व महापालिकेचे वाहनाचे नुकसान झाले होते. या घटनेत 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच आज आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Municipal Corporation Beating cleaners