संकट आले...खानदेशात येथे झालाय टोळधाडीचा प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

शेत शिवारात अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कामांना सुरवात केली आहे. त्यात बहुतांश शेतकऱ्यांनी पुर्वहंगामी कपाशी लागवड केली आहे. सद्यःस्थितीत कपाशीची उगवण क्षमता सुरू होत असताना टोळधाडीने (नाकतोडा) शिरकाव केला आहे.

नेर (ता.धुळे) : कोरोना पाठोपाठ शेतकऱ्यांची चिंता वाढविणारे संकट खानदेशात दाखल झाले आहे. टोळधाडीने (नाकतोडा) खानदेशातील धुळे तालुक्‍यात शिरकाव केला आहे. कपाशी पाणी भरणाऱ्या शेतकऱ्याच्या नरजेस काही तुरळक स्वरूपात नाकतोडे शिवारात पाहण्यास मिळाले. यांचा फैलाव वाढण्याची शक्‍यता आता आणखी वाढली आहे. 

शेत शिवारात अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कामांना सुरवात केली आहे. त्यात बहुतांश शेतकऱ्यांनी पुर्वहंगामी कपाशी लागवड केली आहे. सद्यःस्थितीत कपाशीची उगवण क्षमता सुरू होत असताना टोळधाडीने (नाकतोडा) शिरकाव केला आहे. खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. गेल्यावर्षी बोंडअळी, तर मका पिकावरील अळीचा प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान झाले. त्यामळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक झाला आहे. 

35 हजार नागरीकांचे अन्न एका दिवसात फस्त 
कपाशीवर बोंडअळी, मक्‍यावरील अळी आणि गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेले नुकसान. यानंतर कोरोना व्हायरसमध्ये सारे काही अडकल्याने शेतमालाला भाव नाही. अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यापुढे टोळधाडीचे संकट उभे आहे. या टोळधाडीचे वैशिष्ट्य म्हणजे, 35 हजार नागरिक दिवसाला जे अन्न प्रदान करतात. तेवढे पिकांचे नुकसान एका दिवसाला हजारोच्या संख्येने टोळधाड करत असते. शिवारात टोळधाडीच्या शिरकावाने शेतकरी धास्तावले आहेत. 

उपाययोजनांचे आदेश 
नेर येथील प्रगतिशील शेतकरी डॉ. सतीश बोडरे यांच्या शेतात गुरूवारी कपाशीला पाणी देत असताना टोळधाडीचा उपद्रव त्यांना दिसून आला. त्यांनी लागलीच धुळे जिल्हा परिषद कृषी सभापती बापू खलाणे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून माहिती दिली. कृषी सभापती खलाणे यांनी कृषी अधिकाऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांच्या अडचणी कशा सोडवता येतील, याची तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. कृषी अधिकाऱ्यांमार्फत कृषी सहाय्यक चेतन शिंदे यांना डॉ. बोडरे यांच्या शेतात पाठवले. पिकावर होणाऱ्या टोळधाडीचे निरीक्षण केले. व संबंधित शेतकऱ्याला पर्याप्त उपाययोजना सांगितल्या. पुढील तपासणीसाठी माइटचे नमुने कृषी सहाय्यकांनी सोबत घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule ner village farm Locusts entry