नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात खानदेशी भरीत-भाकरीचा मिळणार स्वाद !

देविदास वाणी
Monday, 2 November 2020

आधुनिक तंत्रज्ञान त्यांना जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे याकरिता सावखेडा येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे.

जळगाव ः जळगावच्या भरताच्या वांग्यांना ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे. भरताच्या वांग्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्यात डिसेंबरमध्ये भरीत महोत्सवाचे आयोजन होईल. तर नागपूर येथील आगामी हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी बचतगटाच्या माध्यमातून भरीत-भाकरीचा स्टॉल लावण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी विभागास दिल्या. 

आवर्जून वाचा- रावेर, यावल तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या तंबूत ! 

जिल्ह्यातील कृषी व पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक येथील अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते. आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, ‘आत्मा’चे मधुकर चौधरी, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्‍यामकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबादचे हेमंत बाहेती, पालचे महेश महाजन आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, की यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रब्बीची पेरणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. याकरिता येत्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध पिकांचे बियाणे व खते मुबलक उपलब्ध होतील याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. पोकरा योजनेंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या शेतीशाळांमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला व तरुण शेतकऱ्यांचा समावेश करावा. जिल्ह्यात शेतीपूरक उद्योग म्हणून दुग्धव्यवसाय वाढण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. 

आवश्य वाचा- शेतातून अचानक बिबट्या आला समोर; आणि शेतकरी सैरावैरा पळाले ! 
 

पशुवैद्यकीय महाविद्यालय जागा हस्तांतर 
शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकडे वळता यावे, याबाबतचे आधुनिक तंत्रज्ञान त्यांना जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे याकरिता सावखेडा येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. हे महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्याकरिता आवश्यक असलेली जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Nagpur winter session legislative convention will be bharit-bhakar stalls