जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिंगाडा मोर्चा !

देविदास वाणी
Saturday, 10 October 2020

अनुपस्थित असतील, त्या पदाधिकाऱ्यांची पदे काढा, जे संघटनेला वेळ देत नसतील, त्यांना नारळ द्या. 

जळगाव ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकाविरुद्ध तसेच हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (ता.१०) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढण्यात आला. 

आवर्जून वाचा- अरे व्वा आता 40 टक्क्यांवर मिळणार अभियांत्रिकीला प्रवेश ! 
 

जळगाव आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी प्रदीप कंद, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्षय गफ्फार मलिक, प्रमोद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, माजी नगराध्यक्ष राजू वानखेडे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मझहर पठाण, सतीश फेगडे आदींसह ५० ते ६० पदाधिकारी उपस्थित होते. ‘मोदी सरकार चले जाव’, ‘कृषिविधेयक रद्द करा’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

संघटनेला वेळ न देणाऱ्यांना नारळ द्या 
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी प्रदीप कंद यांनी मोर्चापूर्वी बैठक घेतली. ते म्हणाले, की कागदावर कार्यकारिणी जम्बो दिसते. मात्र, बैठकीला समाधानकारक उपस्थिती नाही. त्यामुळे जे अनुपस्थित असतील, त्या पदाधिकाऱ्यांची पदे काढा, जे संघटनेला वेळ देत नसतील, त्यांना नारळ द्या. कंद यांनी ग्रामीण व शहरी आशा दोन्ही कार्यकारिणीचा आढावा घेतला. कोण नवे, कोण जुने याची माहिती जाणून घेतली. अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त करीत जे संघटनेला वेळ देतील, अशा मोजक्याच; पण गुणवत्तापूर्ण लोकांची निवड करावी, जे पदाधिकारी अनुपस्थित असतील, त्यांना शो कॉज नोटीस द्या, त्यांना नारळ द्या आणि जबादारी माझ्यावर टाका. राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये शिस्त हवी, प्रोटोकॉलसाठी शिबिर घ्या.

 

संपादन- भूषण श्रीखंडे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon NCP staged a Shingada Morcha in Jalgaon in protest of the Agriculture MLA