esakal | त्‍या पिलांना पाहून चिमुकलीचा जीव घुटमळला..आता त्‍यांची तयारी आकाशी झेप घेण्यासाठी

बोलून बातमी शोधा

bird and girl
त्‍या पिलांना पाहून चिमुकलीचा जीव घुटमळला..आता त्‍यांची तयारी आकाशी झेप घेण्यासाठी
sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : घरट्यातील चिमण्या सापाच्या भक्ष्यस्थानी गेल्यावर तिच्या पिलांच्या संगोपनाचा प्रश्‍न निर्माण झाला.. चौधरी कुटुंबातील चिमुकल्या देवांशीनं या पिलांचे पालकत्वं स्वीकारलं.. पिलांना काय लागतं, त्यांची गरज काय याचा अभ्यास करुन त्यांचं संगोपन केलं.. आता ही पिलं १०-१२ दिवसांची झालीय.. आकाशी झेप घेण्यासारखी..

याबाबत अभियंता पराग चौधरींची मुलगी देवांशीचा हा अनुभव.. साधारणतः दहा ते बारा दिवसापूर्वी शेजारील चिमुरड्या सोज्वळने धावत येऊन त्यांच्या वेलीवर सापाने दोन चिमण्यांना खाऊन टाकल्याचे सांगितले. या चिमण्यांची पिलं मात्र तिथेच होती.

भरण-पोषण सुरु

देवांशीने ही पिलं घरट्यासह घरी आणली. घरीही त्यांचे संगोपन कसे करावे हा प्रश्‍न व मांजरीचा धोका होताच. सुरवातीला त्यांना इंजेक्शन सिरिंजने पाणी भरविले तेव्हा कुठे ती पिलं थोडी शांत झाली. नंतर सुरक्षेसाठी त्यांचे घरटे छोट्या मडक्यात ठेवले. पिलांचा संगोपन कसं करायचं, याचा शोध सुरु झाला. देवांशीच्या आईचा (गौरी) लव-बर्ड्सच्या लाईफस्टाईलबद्दल बऱ्यापैकी अभ्यास होता. त्यानुसार कॅल्शियमसाठी कोंबडीच्या अंड्याचा चुरा व मऊ केलेला भात पिलांना इंजेक्शनच्या सिरिंजने भरवायला सुरुवात केली. पिलांना अवांतर बाधा होऊ नये, म्हणून कडूलिंबाचा पाला कुस्करून त्यांच्या घरट्यात टाकला.

बाळसं धरु लागली..!

भाऊ प्रथमेशच्या मदतीने स्ट्रॉला पक्ष्याचा चोचीचा आकार देऊन त्यातून पिलांना अन्न भरवू लागले.. पिलांचा प्रतिसाद मिळू लागला.. छोटीशी पिलं बाळसं धरू लागली. साधारण तिसऱ्या-चौथ्या दिवशीच गुलाबी पिल्लांच्या अंगावर पांढरे केस उगवू लागले..

पराग चौधरींनी दीपनगर येथील पक्षीमित्र लक्ष्मीकांत नेवे व महाबळ येथील अमोघ जोशी यांचे मार्गदर्शन घेतले.. त्यातून ही पिलं Silver Bill या पक्ष्याची असल्याचे कळले.. आता ही पिलं बऱ्यापैकी मोठी झालीत.. या दहा-बारा दिवसांत पिलं घरातच भरारी घेऊ लागलीत.. अजूनही त्यांची काळजी घेणं सुरु आहे.

लॉकडाऊनच्या या काळात पिलांना जीवदान देणं, त्यांच्या पंखांना बळ देण्याचं सत्कर्म घडलं, त्याचं समाधान आहे. पिलं पूर्ण मोठी झाल्यानंतर त्यांना त्यांच्या अधिवासात मुक्त करु.

- देवांशी चौधरी