जळगावात कोरोनाचे केवळ दोन रुग्ण; तर नऊ तालुक्यांत नवीन रुग्ण नाही !

सचिन जोशी
Monday, 2 November 2020

दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या शंभर, पन्नाशीच्या आत राहत आहे. सोमवारी प्राप्त १७०० अहवालात अवघे ३४ रुग्ण आढळून आले.

जळगाव : कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात येतोय. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांचा आकडा पन्नाशीच्या आत राहिला. गेल्या पाच महिन्यांतील सर्वांत निचांकी म्हणून अवघे ३४ नवे रुग्ण आढळून आले तर १०४ रुग्ण बरे झाले. गेल्या २४ तासांत एकाच रुग्णाचा मृत्यू झाला. आज जवळपास ९ तालुक्यांत एकही रुग्णाची नोंद आढळली नाही. 

वाचा- ‘कोरोना’च्या दुसऱ्या लाटेची भीती; बंद होणारे इकरा कोविड सेंटर पून्हा सुरू !
 

जळगाव जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याचे चित्र आहेत. दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या शंभर, पन्नाशीच्या आत राहत आहे. सोमवारी प्राप्त १७०० अहवालात अवघे ३४ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५३ हजार २६५ झाली आहे. तर दिवसभरात १०४ रुग्ण बरे झाल्यानंतर एकूण बरे झालेल्यांचा आकडाही ५१ हजार २७६वर पोचला आहे. एकमेव मृत्यूसह एकूण बळींची संख्या १२६९ झाली आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९६.२७ टक्क्यांवर पोचला आहे. 

जळगावात अवघे दोन रुग्ण 
एकीकडे महिना, दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची रोजची संख्या घटत असताना जळगाव शहरात मात्र तीस-चाळीस रुग्ण दररोज आढळून येत होते. शहरातील रुग्णांचा आकडा एकअंकी झालाच नव्हता, तो आज आढळून आला. जळगावात आज अवघे २ रुग्ण सापडले. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव २, जळगाव ग्रामीण ५, भुसावळ १४, चोपडा २, अमळनेर १, रावेर २, मुक्ताईनगर ८.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon no new cases of corona in nine talukas of Jalgaon district