
ज्या सेंटरमध्ये रुग्ण नसतील तेथील स्टाफ त्यांच्या जागी रुजू करावा. मात्र केअर सेंटरची देखभाल रोज करावी, दिवाळीनंतर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू शकते.
जळगाव ः जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गाचे रुग्ण कमी झालेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर बंद करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य यंत्रणेने तालुका यंत्रणांना दिल्या होत्या. मात्र, त्या आता मागे घेण्यात आल्या आहेत. दिवाळीनंतरही काही दिवस कोविड केअर सेंटर पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आवश्य वाचा- नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात खानदेशी भरीत-भाकरीचा मिळणार स्वाद !
जळगाव शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. सर्व बाजारपेठा, व्यवहार पूर्ववत सुरू झालेले आहेत. कोरोनामुळे नागरिकांना रोजगार गमवावा लागला होता. तो त्यांना परत मिळण्यास सुरवात झाली आहे.
दुसरीकडे रुग्णसंख्या कमी झाल्याने कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण कमी अन् कर्मचारीसंख्या अधिक असे चित्र आहे. यावर उपाय म्हणून ज्या ठिकाणी कमी रुग्ण असतील तेथील रुग्ण जवळच्या सीसीसीमध्ये दाखल करून ते केअर सेंटर बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भुसावळ परिसरातील सर्व रुग्ण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्याचा, तर अमळनेर परिसरातील रुग्ण चोपडा सीसीसीमध्ये, चाळीसगाव परिसरातील चाळीसगावला ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ज्या सेंटरमध्ये रुग्ण नसतील तेथील स्टाफ त्यांच्या जागी रुजू करावा. मात्र केअर सेंटरची देखभाल रोज करावी, दिवाळीनंतर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू शकते. त्यादृष्टीने सज्जतेचा इशाराही देण्यात आला आहे.
वाचा- रावेर, यावल तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या तंबूत !
एकच रुग्ण
जळगाव शहरातील इकरा कोविड केअर सेंटरमध्ये केवळ एक रुग्ण आहे. तेथे ४० जणांचा स्टाफ कार्यरत आहे. यामुळे तो रुग्ण जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगण्यात आले होते. एका रुग्णावर ४० जणांचा स्टाफ परवडणारा नाही, अशी भूमिका होती. मात्र तेही सेंटर आता लाटेची शक्यता लक्षात घेऊन पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. सी. चव्हाण यांनी दिली.
संपादन- भूषण श्रीखंडे