
चार-पाच दिवसांपासून साठीच्या घरात नवे रुग्ण आढळून येत होते. बुधवारी ही संख्या ९६ वर पोचून एकूण रुग्णांचा आकडा ५४ हजार ३३० झाला आहे.
जळगाव : दिवाळीनंतर अपेक्षेप्रमाणे कोरोनाचा संसर्ग पुन्हा डोके वर काढू लागला आहे. चार-पाच दिवसांपासून साठीच्या घरात राहणारा नव्या रुग्णांचा आकडा बुधवारी शंभरीजवळ जाऊन पोचला. दिवसभरात ९६ नवे रुग्ण आढळून आले असून, त्यापेक्षा निम्म्याहून कमी म्हणजे ४१ रुग्ण बरे झाले. आठवडाभरापासून रुग्ण वाढू लागल्याने ॲक्टिव्ह रुग्णसंख्याही पाचशेच्या वर पोचली आहे.
वाचा- विद्यार्थ्यांसाठी उपचारासाठी स्वतंत्र कक्ष उभारा-विभागीय आयुक्त गमे
जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यांपासून नियंत्रणात असलेला कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत झालेल्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग पुन्हा वाढून नियंत्रणाबाहेर जाईल, अशी भीती व्यक्त होत होती; ती आता खरी ठरत आहे. चार-पाच दिवसांपासून साठीच्या घरात नवे रुग्ण आढळून येत होते. बुधवारी ही संख्या ९६ वर पोचून एकूण रुग्णांचा आकडा ५४ हजार ३३० झाला आहे. तर दिवसभरात ४१ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांची संख्याही ५२ हजार ५२५ पर्यंत पोचली आहे. गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, बळींची संख्या एक हजार २९१ झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्याने चारशेच्या आत गेलेली ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आज ५१४ वर पोचली आहे.
भुसावळला संसर्ग वाढला
जिल्ह्यात जळगाव शहर व भुसावळला संसर्ग सातत्याने वाढतो आहे. बुधवारी जळगाव शहरात २३ रुग्ण आढळून आले, तर भुसावळमध्ये तब्बल २७ रुग्णांची नोंद झाली. अन्य ठिकाणी आढळलेले रुग्ण असे- जळगाव ग्रामीण- तीन, अमळनेर- एक, चोपडा- सात, भडगाव- दोन, पाचोरा- तीन, यावल- चार, जामनेर- नऊ, रावेर- तीन, पारोळा- दोन, चाळीसगाव- दोन, मुक्ताईनगर- एक, अन्य जिल्ह्यातील- सात.
आवश्य वाचा- जळगावचा ‘फौजदार’अजय देवगण, सुनील शेट्टी सोबत करणार अभिनय
चार हजारांवर चाचण्या
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. जळगाव शहरात त्या कमी असल्या तरी जिल्ह्यात अधिक तपासण्या होत आहेत. बुधवारी रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांचे सुमारे तीन हजार ५०० ते आरटीपीसीआर चाचण्यांचे साडेसहाशे अहवाल प्राप्त झाले. दोन्ही चाचण्या मिळून पॉझिटिव्हीटी रेट तीन टक्क्यांपर्यंत पोचला आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे