ऑनलाईन मोबाईल रिचार्ज करताय...तर मग थांबा अगोदर हे वाचा दोघे कसे फसले

online recharge
online recharge

जळगाव : ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. नोटाबंदी आणि नुकतेच झालेल्या लॉकडाउनमुळे ऑनलाइन पेमेंट करण्याकडेच जनतेचा कल आहे. परिणामी सायबर गुन्हेगारांच्या तावडीत ही मंडळी सहजासहजी सापडते. जिल्‍हा न्यायालयातील कर्मचारी आणि सामान्य लिफ्ट मेकॅनिक, अशा दोघांना सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळ्या घटनांत लुटले आहे. 
शिवाजीनगर भागातील रहिवासी अफजल खान बिस्मिल्ला खान (वय ३१) हे लिफ्ट मेकॅनिक आहेत. त्यांनी जिओ मोबाईलचे ऑनलाइन पद्धतीने १४९ रुपयांचे रिचार्ज केले. मात्र, दुसरा दिवस उलटूनही ‘एसएमएस’ येत नाही म्हणून गुगलवरून ‘जिओ’चा कस्टरमर केअर नंबर शोधून संपर्क केला. समोरच्या व्यक्तीने त्यांना क्वीक रिस्पॉन्स ॲपची माहिती भरण्यास सांगून खात्याचा ओटीपी, एटीएम नंबर मिळाल्यावर एकामागून एक, अशा चार वेळा ३७ हजार ४८१ रुपये लंपास केले. 

न्‍यायालयातील कर्मचारीही फसला
दुसऱ्या घटनेत जिल्‍हा न्यायालयातील स्टेनो संदीप भोई (रा. शिवाजीनगर) यांनी १६ ऑगस्टला एअरटेल कंपनीच्या मोबाईल रिचार्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने ७९ रुपयांचे रिचार्ज घेतले. मात्र, त्यांचाही मोबाईल रिचार्ज न झाल्याने त्यांनी कस्टमर केअरशी संपर्क केला. त्यांना क्वीक रिस्पॉन्स ॲप डाउनलोड करण्यास सांगून माहिती भरल्यावर पैसे तर परत मिळाले नाहीत. उलट खात्यातून चक्क २० हजार रुपये सायबर गुन्हेगारांनी लंपास केले. 

गुन्हे दाखलसाठी फिरवाफिरव 
तक्रार देण्यास येणाऱ्या व्यक्तीला पोलिस ठाण्यातून सायबर पोलिस ठाण्यात पाठविले जाते. मात्र, पाच लाखांच्या वर ऑनलाइन फसवणूक झाल्यावरच सायबर पोलिस ठाण्यात त्याचा गुन्हा दाखल होतो, असे सांगत पुन्हा पोलिस ठाण्यात रवानगी होते; अन्यथा ज्या- त्या पोलिस ठाण्यात पाठविले जाते. पोलिस ठाण्यात आल्यानंतर साहेबांच्या पुढे तक्रारदाराला उभे करून, नंतर साहेबांनी सांगितलेच तर त्याची तक्रार टंकलिखित होते. नाहीतर येथूनही पिटाळण्यात येते. 

लग्नाची तयारी थांबली 
लिफ्ट मेकॅनिक अफजल याने लग्नाच्या खरेदीसाठी स्टेट बँक खात्यात रक्कम जमा केली होती. मात्र, त्यापैकी भामट्यांनी ३७ हजार ४८१ रुपये लांबविले. मोबाईलवर मेसेज आल्यावर त्याने स्टेट बँकेशी संपर्क केला. मात्र, त्यांचे सर्व्हर ‘स्लो’ असल्याने त्यांच्याकडून कुठलीच मदत मिळू शकली नाही. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com