पद्मालय देवस्‍थानात घेता येणार नाही दर्शन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 November 2020

त्रिपुरारी पौर्णिमेला संपुर्ण खान्देशातून भाविक भक्त पद्मालय देवस्थानला दर्शनासाठी येत असतात. वर्षभर केलेले संकल्प, व्रत, नैवेद्य, नवस पुर्ण करण्यासाठी त्रिपुरारी पोर्णिमेला पद्मालय येथे मोठा यात्रा उत्सव होतो.

जळगाव : एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थान त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय श्री गणपती मंदीर देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतला. 
त्रिपुरारी पौर्णिमा यात्रा देवस्थान समितीतर्फे साजरी करण्यात येते, मात्र यंदा ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर 29, 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर या तीन दिवसांमध्ये यात्रा होणार नाही. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासकिय नियमावलीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे मंदीर व्यवस्थापनाने कळविले आहे. 

नवस फेडण्यासाठी होते गर्दी
पद्मालय येथे एकाच व्यासपीठावर डाव्या आणि उजव्या सोंडेचे स्वयंभू दोन गणेशजी विराजमान आहेत. अमोद आणि प्रमोद असे त्यांना संबोधले जाते. श्री गणेशजींची पौर्णिमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेला संपुर्ण खान्देशातून भाविक भक्त पद्मालय देवस्थानला दर्शनासाठी येत असतात. वर्षभर केलेले संकल्प, व्रत, नैवेद्य, नवस पुर्ण करण्यासाठी त्रिपुरारी पोर्णिमेला पद्मालय येथे मोठा यात्रा उत्सव होतो. यामध्ये ग्रामीण भागासह शहरांतूनही भाविक भक्त येतात. यात्रा उत्सवामुळे कटलरी, खाद्यपदार्थाची हॉटेल्स, रसवंती, खेळणींची दुकानेही थाटली जातात. कोरोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेसह तीन दिवस देवस्थान दर्शनासाठीसुद्धा बंद ठेवण्यात आले आहे. 

हे देखील राहणार बंद
या तिनही दिवशी मंदीर परिसरात खाद्यपदार्थासाठी हॉटेल, कटलरी, दुकान, रसवंती, फेरीवाले कुणालाही व्यवसायालासुद्धा बंदी ठेवण्यात आले आहे. भाविक भक्तांना नवस, नैवद्य, धार्मिक पुजा विधी करता येणार नसून तीन दिवस मंदीर बंद राहणार आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार यात्रा व मंदीर बंदचा निर्णय घेण्यात आला असून भाविक भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहनही मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon padmalaya ganpati tempal close three days