चार महिन्यांपासून पासपोर्ट लॉक! 

passport
passport

जळगाव : पासपोर्ट काढण्यासाठी मुंबईला जावे लागत होते; परंतु पोस्ट कार्यालयाचे पासपोर्ट ऑफिस सुरू करण्यात आल्‍याने मुंबईचे हेलपाटे थांबले आहेत. मात्र कोरोनमुळे गेल्‍या चार महिन्यांपासून बंद झालेल्या पासपोर्ट कार्यालयाचा अजूनही लॉकडाउन संपलेला नाही. हे कार्यालय सुरू होण्याची प्रतीक्षा नागरिकांना आहे. 
पासपोर्ट मिळविण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केल्‍यानंतर नागरिकांना कागदपत्रे आणि मुलाखतीसाठी नाशिक व मुंबई पासपोर्ट कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. मात्र जळगावात कार्यालय सुरू झाल्‍याने नागरिकांसाठी हे सोयीचे झाले आहे. शहरातील तहसील कार्यालयाजवळील पोस्‍टाच्या जागेवर पासपोर्ट कार्यालय गेल्‍या दीड वर्षापासून सुरू आहे. मात्र कोरोनाचा फैलाव सुरू झाल्‍यानंतर देशात लॉकडाउन पुकारण्यात आला होता. साधारण अडीच महिने लॉकडाउन राहिल्‍यानंतर अनलॉक सुरू झाले. यानंतरदेखील पासपोर्ट कार्यालयाचा अद्याप लॉकडाउन सुटलेला नाही. 

थम व फोटो घेणे आवश्‍यक 
पासपोर्टसाठी ऑनलाइन रजिस्‍ट्रेशन केल्‍यानंतर पासपोर्ट कार्यालयाकडून संबंधित व्यक्‍तीची कागदपत्रे तपासणी आणि मुलाखतीची तारीख देण्यात येत असते. त्‍या दिवशी पासपोर्ट घेणाऱ्या व्यक्‍तीचे थम आणि फोटो घेण्यात येत असतात. ही सारी प्रक्रिया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवणे अपेक्षित असल्‍याने पासपोर्ट कार्यालयातील हे कामकाज चार महिन्यांपासून बंद आहे. यामुळे देशातील सर्व पासपोर्ट कार्यालयेच अद्यापपर्यंत बंद आहेत. 

आंतरराष्‍ट्रीय विमानसेवाही बंद 
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्‍याने आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील विमानसेवादेखील अद्याप बंद आहे. देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली असली तरी त्‍याकरिता पासपोर्टची आवश्‍यकता नाही. मुळात आंतरराष्‍ट्रीय विमानसेवा बंद असल्‍याने पासपोर्टसाठीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रियादेखील बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी नोंदणी करणारेदेखील नाहीत. यामुळे पासपोर्ट कार्यालयात कागदपत्र पडताडणीसाठी कोणाला बोलविण्याची तारीख देण्यात आलेली नाही. लॉकडाउनपूर्वी ज्‍यांना तारीख देण्यात आली होती त्‍यांना कार्यालय सुरू झाल्‍यानंतर नव्याने तारीख देण्यात येणार असल्‍याचे पोस्‍ट विभागातर्फे सांगण्यात आले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू झाल्‍यानंतर पासपोर्ट कार्यालय बंद करण्यात आले आहे. हे सुरू करण्याबाबत केंद्रीय स्‍तरावरून निर्णय झाल्‍यानंतरच निर्णय घेण्यात येईल. प्रामुख्याने जळगाव आणि भुसावळ रेड झोनमध्ये असल्‍याने सध्या तरी पासपोर्ट कार्यालय सुरू होऊ शकणार नाही. 
-पी. बी. सेलूकर, प्रभारी डाक अधीक्षक, जळगाव 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com