जळगाव शहरात तात्पुरत्या मलमपट्टीने रस्त्यांची आणखी लागली वाट !

सचिन जोशी
Wednesday, 4 November 2020

शहरातील विकासकामांना ‘ब्रेक’ लागलेला असताना सात महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे होती नव्हती ती कामेही रखडली आहेत. चार महिने पावसाचे गेल्यानंतर रस्त्यांची पूर्णत: वाट लागली.

जळगाव : स्वच्छता, आरोग्य, पथदीप, रखडलेली अमृत योजना यामुळे नरकयातना भोगणाऱ्या जळगावकरांना रस्त्यांच्या दुरवस्थेने अधिक त्रस्त केले आहे. सध्या काही भागांत सुरू असलेली रस्त्यांची मलमपट्टी केवळ तात्पुरती असून, त्यामुळे रस्त्यांची आणखी वाट लागत आहे. प्रशासन उदासीन, सत्ताधारी हताश अशा स्थितीत विरोधक या प्रश्‍नांवर केवळ सोशल मीडियावर सक्रिय असल्याचेच तेवढे दिसत आहेत. 

आवश्य वाचा- जळगाव शहरात ‘अमृत’च्या जलवाहिन्या लवकरच मुख्य जलवाहिनीला जोडल्या जाणार !

जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था ग्रामीण भागातील रस्त्यांपेक्षाही बिकट आहे. चांगले, गुळगुळीत रस्ते जळगावकरांच्या नशिबी कधी येतील, याबाबतची भविष्यवाणी जगातील कुठलाही ज्योतिषी वर्तवू शकत नाही, अशी स्थिती आहे. 

रस्त्यांना ‘अमृत’चा शाप 
अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था असताना गेल्या तीन वर्षांपासून शहरात सुरू झालेल्या ‘अमृत’ योजनेचाही शाप या रस्त्यांना लागला आहे. या योजनेंतर्गत जलवाहिन्यांसाठी शहराच्या मध्यवर्ती भागासह सर्वच वस्त्यांमधील रस्ते खोदून ठेवले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीचे व नव्या रस्त्यांच्या कामांना ‘अमृत’ योजना पूर्ण झाल्याशिवाय हे कारण पुढे करत खोडा बसला आहे. 

वाचा- घामाच्या पैश्यासाठी "त्या दोघे" कोरोना योद्धा चे हेलपाटे !
 

तात्पुरती मलमपट्टी 
शहरातील विकासकामांना ‘ब्रेक’ लागलेला असताना सात महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे होती नव्हती ती कामेही रखडली आहेत. चार महिने पावसाचे गेल्यानंतर रस्त्यांची पूर्णत: वाट लागली. मोठमोठ्या खड्ड्यांची दुरुस्ती दोन-चार वेळा करण्यात आली. पण या भल्यामोठ्या खड्ड्यांमध्ये वेस्ट मटेरिअल वगैरे टाकून प्रशासन मोकळे होत आहे. या तात्पुरत्या मलमपट्टीने रस्त्याची अवस्था आणखीच वाईट होत असून, त्यामुळे नागरिकांच्या यातनांमध्ये वाढच होत आहे. 

धुळीचे प्रदूषणही वाढले 
वेस्ट मटेरिअल आणि मुरूम खड्ड्यांमध्ये टाकला जात असल्याने वाहने गेल्यानंतर तो रस्त्यावर येतो. त्यामुळे प्रचंड धूळ उडते. या धुळीमुळे प्रदूषण वाढून वाहनधारकांना अधिक त्रास होतो. त्यातून श्‍वसनाच्या तक्रारीही वाढल्या आहेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon municipality started repairing bad roads but the roads got even worse