तिजोरी सप्लायरला लुटणारे दरोडेखोर चोविस दिवसांनतर पोलिसांनी केली अटक

रईस शेख
Friday, 27 November 2020

गुन्ह्यात मोठी रक्कम, घातक शस्त्रे आणि माहिती असलेल्या अट्टल गुन्हेगारांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. 

जळगाव : शहरातील शाहूनगर पिंप्राळा रोडवरील व्यापाऱ्याच्या गाळ्यावर चाकू लावून लुटणाऱ्या दोन दरोडेखोरांना गुन्हे शाखेने अटक केली. दीपक ललवाणी, दीपक चव्हाण असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. 

आवश्य वाचा- जळगावातील बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकावर आर्थिक गुन्हे शाखेची धाड 

शाहूनगर भागातील पिंप्राळा रोडवरील विलास नाईक यांचे अवजड तिजोऱ्या विक्रीचे गुदाम व दुकान आहे. जिल्ह्यासह निम्म्या महाराष्ट्रातील व्यापारी संस्थाने, बँकांना त्यांच्याकडील तिजोऱ्या बसविण्यात आल्या आहेत. (ता. २) नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास तोंडाला फडके गुंडाळलेले दोन तरुण आत आले. यातील एकाने तिजोरी हवी असल्याचे सांगितले.  त्यावर त्यांनी आता शिल्लक नाही, असे सांगितल्यावर दुसरा इसम दुकानात शिरून शटर बंदकरून काही कळण्याच्या आतच विलास नाईक यांच्या गळ्याला चाकु लावून पैशांची विचारणा करून रक्कम लुटून नेली. विलास नाईक यांच्या तक्रारीवरून शहर पेालिसांत जबरी लुटीचा गुन्हा दाखल आहे. 

दोघांना अटक 
गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण बकाले यांच्या पथकातील रवींद्र गिरासे, विजयसिंग पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर यांनी गुप्त माहिती काढून धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटा येथील फार्महाउसवरून दीपक ललवाणी (वय ३२, रा. मुसळी फाटा, ता. धरणगाव), दीपक चव्हाण (३२, रा. इंद्रनील सोसायटी, जळगाव) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून मोबाईल जप्त करण्यात आला. 

मोठ्या रकमेचा संशय 
विलास निकम यांचा अनेक वर्षांपासूनचा तिजोरी विक्रीचा व्यवसाय आहे, निव्वळ हजार रुपयांसाठी जिवावर उदार होत चाकु लावून लूट करणार नाही, हजार रुपये लुटीच्या गुन्ह्यात शहर पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखा २४ दिवस संशयिताचा शोध घेऊन त्याला अटक करेल अशी परिस्थिती नाही. या गुन्ह्यात मोठी रक्कम, घातक शस्त्रे आणि माहिती असलेल्या अट्टल गुन्हेगारांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Police have arrested the robbers who robbed the vault supplier