esakal | जेल तोडून त्‍याने पळविले कैदी; पण इथे मात्र ते अडकलेच
sakal

बोलून बातमी शोधा

police search opretion

बसमधील एका प्रवाशाने माहिती दिल्यावर मालेगाव-सुरत बसमधून पळून जाताना जगदीश पुंडलिक पाटील (वय १९, रा. पिंपळकोठा, ता. पारोळा) याला पोलिस पथकाने अटक केली.

जेल तोडून त्‍याने पळविले कैदी; पण इथे मात्र ते अडकलेच

sakal_logo
By
रईस शेख

जळगाव : जिल्हा कारागृहातील सुरक्षारक्षकाच्या डोक्यावर पिस्तूल रोखून तिघा कैद्यांना दुचाकीवरून पळवून नेणाऱ्या संशयितास गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांच्या ‘सर्च ऑपरेशन’नंतर साक्री (जि. धुळे) येथून लक्झरी बसने सुरत येथे पळून जाताना अटक केली. त्याने पळवून नेलेल्या साथीदार कैद्याबद्दल अद्याप चौकशी सुरू आहे. 
कारागृहातील कैदी सागर संजय पाटील, गौरव विजय पाटील (दोन्ही रा. अमळनेर) दोन्ही दरोडा, दंगलीच्या गुन्ह्यात, तर सुशील अशोक मगरे हा बडतर्फ पोलिस कर्मचारी पुणे येथील सराफी दुकानात गोळीबार करून लूट केल्याप्रकरणी कारागृहात होता. तिन्ही संशयितांनी २५ जुलैस सकाळी सुरक्षारक्षक पंडित गुंडाळेला मारहाण करीत त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून सिनेस्टाइल पलायन केले होते. 

२४ तासांचे ‘सर्च ऑपरेशन’ 
जळगाव गुन्हे शाखेसह धुळे गुन्हे शाखा, साक्री पोलिस, अमळनेर पोलिस असा फौजफाटा गेली २४ तास संशयितांचा शोध घेत होती. निरीक्षक शिवाजी बुधवंत, निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह निरीक्षक बापू रोहम यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक स्वप्नील, उपनिरीक्षक सुधाकर लहारे, संजय हिवरकर, राजेंद्र मेंढे, शरद पाटील, किरण धनगर, असे सशस्त्र पोलिस बल संशयितांचा शोध घेत होते. अखेर बसमधील एका प्रवाशाने माहिती दिल्यावर मालेगाव-सुरत बसमधून पळून जाताना जगदीश पुंडलिक पाटील (वय १९, रा. पिंपळकोठा, ता. पारोळा) याला पोलिस पथकाने अटक केली. सागर, गौरव आणि सुशील यांना एकाच दुचाकीवर बसवून थेट नंदुरबार गाठल्याची माहिती जगदीश पाटील याने गुन्हे शाखेला दिली. 

जंगल काढले पिंजून 
तुरुंग तोडून गौरव आणि सागर पळून गेल्यानंतर त्यांनी अमळनेरमध्येच धुमाकूळ घालत गुन्हे सुरू केले होते. दोन दिवसांपूर्वीच संशयितांच्या हालचालींची गुप्त माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहम २० कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन अमळनेर येथे ठाण मांडून होते. अमळनेरला पोचल्यावर जगदीशचाही मागमूस लागला. अमळनेर ते धुळे आणि पिंपळे ते डांगर यादरम्यान जवळपास साडेचारशे एकरातील जंगल पोलिस पथकांनी पिंजून काढला. ड्रोन कॅमेरा आणि इतर अत्याधुनिक साधनांचा येथे वापर करण्यात आला. याचदरम्यान जगदीश पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून इतरांची माहिती मिळेल. तसेच आणखी एका संशयिताचा ठावठिकाणा लागल्याचे माहिती निरीक्षक बापू रोहम यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top