खासगी बसची चाके रुतल्याने पाचशे कोटींची उलाढाल ठप्प 

रईस शेख
Friday, 3 July 2020

कोरोनामुळे 24 मार्चपासून लॉकडाउन सुरू असून, सर्व सार्वजनिक वाहतूक बंद आहे. राज्य महामंडळाच्या बस परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात सोडण्यापुरत्या वापरल्या गेल्या. नंतर त्याही ज्या-त्या आगारात उभ्याच आहेत.

जळगाव  : शहरासह जिल्ह्यातून देशभर लक्‍झरी बसद्वारे होणारी प्रवासी वाहतूक तीन महिन्यांपासून बंद आहे. जिल्ह्यातून ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या सुमारे 550 बस राज्य व राज्याबाहेर प्रवासी वाहतूक करीत होत्या. जिल्हांतर्गत 700 बस खासगी प्रवासी वाहतूक करीत होत्या. कोरोनामुळे प्रवासी वाहतूक व्यवसायातील 500 कोटींची उलाढाल ठप्प असून, हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही अटी-शर्तींनुसार प्रवासी वाहतूक सुरू करावी, यासाठी असोसिएशनने राज्य शासनाला साकडे घातले आहे. 
कोरोनामुळे 24 मार्चपासून लॉकडाउन सुरू असून, सर्व सार्वजनिक वाहतूक बंद आहे. राज्य महामंडळाच्या बस परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात सोडण्यापुरत्या वापरल्या गेल्या. नंतर त्याही ज्या-त्या आगारात उभ्याच आहेत. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या गुणाकार पद्धतीने वाढत असताना, आधीच तोट्यात असलेल्या महामंडळाला जोखीम परवडणारी नसल्याने त्यांच्या संघटना अद्याप शांत आहेत. मात्र, खासगी प्रवासी वाहतूकदारांनी आवाज उठवण्यास आता सुरवात केली आहे. राज्यातील 35 जिल्ह्यांतून लक्‍झरी बस वाहतूकदारांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाला साकडे घातले आहे. राज्य संघटनेने 24 जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ट्रॅव्हल्स व्यवसाय सुरू करण्याबाबत चर्चा केली. 

परप्रांतीय बसचा उपद्रव 
राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, अरुणाचल प्रदेशातील खासगी प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. संबंधित राज्यांनी प्रवासी वाहतूकदारांना चक्क सहा महिन्यांचे कर माफ केले असून, टोल फ्री, विमा सवलती दिल्याने त्या- त्या राज्यात खासगी बसची प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. याबाबत महाराष्ट्रात अद्याप निर्णय झालेला नाही. याचा गैरफायदा परप्रांतीय वाहतूकदार घेत आहेत. गुजरात, मध्य प्रदेशाच्या शेकडो बस महाराष्ट्रातून प्रवासी वाहतूक करीत आहेत. 
 
चार महिन्यांपासून व्यवसाय बंद

राज्यातील जवळपास एक लाख कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाने खासगी बसला तत्काळ परवानगी देणे अपेक्षित आहे. आम्ही 40 ऐवजी 20 प्रवासी वाहतूक करू, नियम-अटी शर्तींचे काटेकोर पालन करण्यासही आम्ही तयार आहोत. शासनाने कर आकारणीत सवलत द्यावी, काही महिने टोलमाफ करावा; अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही. 
-मुकेश बेदमुथा, अध्यक्ष, ट्रॅव्हल्स संघटना, जळगाव 
 
जिल्हा खासगी ट्रॅव्हल्स दृष्टिक्षेप 
एकट्या पुण्यात जाणाऱ्या : रोज 60 फेऱ्या 
मुंबईसाठी जाणाऱ्या : रोज 30 फेऱ्या 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon private bus 500 carrore uladhal stop lockdown periad