जनता कर्फ्यूचा ‘उतारा’कुचकामी... नागरिक रस्त्यावर येण्याचे थांबेना !

देविदास वाणी
Saturday, 25 July 2020

जळगाव शहरात २० जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, त्यात महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, पोलिस जनता कर्फ्यूच्या काळात नागरिकांना जाब विचारताना दिसत नाहीत.

जळगाव : शहरातील प्रभाग १३ ते १५ मधील मेहरूण, फुकटपुरा, गणपतीनगर, आदर्शनगर आदी परिसरात शुक्रवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. महापालिकेने प्रभागनिहाय जनता कर्फ्यू जाहीर करून त्या-त्या प्रभागात दुकानांवर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविले. मात्र, नागरिक रस्त्यावर येण्याचे थांबत नसल्याचे चित्र आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी महापालिकेने प्रभागनिहाय जनता कर्फ्यू जाहीर केला. संबंधित प्रभागातील अत्यावश्‍यक दुकाने वगळता दुकानदार कडकडीत बंद पाळतात. मात्र, नागरिकांना घरी गुमान बसविण्यात महापालिका, पोलिस अद्याप कमीच पडत असल्याचे चित्र आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. यावर उपाय म्हणून जळगाव, भुसावळ, अमळनेर लॉकडाउन करण्यात आले. त्यानंतर महापालिका, पालिकांनी प्रभागनिहाय किंवा शहरनिहाय जनता कर्फ्यूचा संबंधित प्रशासनाने निर्णय घ्यावयाचे आदेश आहेत. जळगाव शहरात २० जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, त्यात महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, पोलिस जनता कर्फ्यूच्या काळात नागरिकांना जाब विचारताना दिसत नाहीत. यामुळे एका प्रभागात दुकाने बंद असली, तरी नागरिक दुसऱ्या प्रभागात जाऊन खरेदी करतात. 

म्हणून दुकाने बंद 
महापालिकेचे अधिकारी दंडात्मक कारवाई करतील, अशी भीती दुकानदारांमध्ये आहे. यामुळे जनता कर्फ्यूच्या भागात दुकाने बंद राहतात. मात्र, इतर व्यवहार सुरूच असतात. शुक्रवारी मेहरूण परिसरात भाजीपाला विक्रेते, कुल्फी विक्रेते, रिक्षाचालक, सलूनची दुकाने सुरू होती. कर्फ्यूचे काही देणे-घेणे नसल्यागत ते दिसून आले. याकडे महापालिकेचे अधिकारी, पोलिसांनी लक्ष दिले तर शंभर टक्के जनता कर्फ्यू यशस्वी होईल अन्यथा जनता कर्फ्यू येतील अन्‌ जातील. मात्र, कोरोनाची साखळी तुटणारच नाही. 

आज प्रभाग १६ व १७ मध्ये जनता कर्फ्यू 
शनिवारी (ता. २६) प्रभाग १६ व १७ मध्ये जनता कर्फ्यू होणार आहे. प्रभाग १६ मध्ये सिंधी कॉलनी, लक्ष्मीनगर, कंजरवाडा, देनीदास कॉलनी, ढाके कॉलनी, मासूमवाडी, सालारनगर, कासमवाडी, सम्राट कॉलनी परिसर, तर प्रभाग १७ मध्ये बुनकरवाडा, विठ्ठल पेठ, खळवाडी, साधना शाळा परिसर, श्रीकृष्णनगर, सदोबानगर, अयोध्यानगर, यमुनानगर भाग आदी परिसर आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon public curfew not Cooperation public