
पावसाचा व ढगाळ वातावरणाचा शासकीय कापूस खरेदीलाही फटका बसला आहे. सीसीआय व पणन महामंडळाच्या खरेदी केंद्रांमध्ये कापूस पडून आहे.
जळगाव : जिल्ह्यात शनिवार (ता. १२)पासून पावसाने हजेरी लावल्याने शासनाने सुरू केलेल्या कापूस खरेदी केंद्रावरील कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस केंद्रावर कापूस खरेदीअभावी कपाशीने भरलेल्या वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत.
कुऱ्हे (ता. भुसावळ), पहूर (जामनेर), धरणगाव, कासोदा, दळवेल, पारोळा येथील केंद्रांवर शेतकरी कापूस विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाचा व ढगाळ वातावरणाचा शासकीय कापूस खरेदीलाही फटका बसला आहे. सीसीआय व पणन महामंडळाच्या खरेदी केंद्रांमध्ये कापूस पडून आहे. त्याची प्रक्रिया गतीने करून गाठी व सरकी सुरक्षित ठिकाणी साठवाव्या लागतील. अशा स्थितीत धावपळ आहे. नव्याने कापूस खरेदी करणे शक्य नाही. या सर्वच बाबी लक्षात घेऊन कापूस खरेदी बंद करण्यात आली. याबाबत सीसीआयच्या संबंधित केंद्रप्रमुखांनी बाजार समित्यांना तातडीने पत्र दिले आहे. खरेदी येत्या मंगळवार (ता. १५)पर्यंत बंद करण्यात आली आहे. परंतु वातावरण मंगळवारनंतरही प्रतिकूल, पावसाळी राहिले, तर खरेदी सुरू केली जाणार नाही.
बंदचे आदेश मागे घेण्यासाठी गोंधळ
खरेदी बंदचे आदेश देण्यापूर्वीच केंद्रात कापूस विक्रीसाठी ट्रॅक्टर व इतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अशातच खरेदी बंदचे आदेश जारी झाल्याने कापसाने भरलेली वाहने खरेदी केंद्राबाहेर रांगेत उभी होती. खरेदी बंदचे आदेश मागे घेण्यासाठी कुऱ्हे (ता. भुसावळ) येथे शेतकऱ्यांनी संतप्त होऊन गोंधळ घातला. सीसीआय व पणन महासंघाने पावसाने कापसाचे नुकसान झाल्यास शासन व पर्यायाने नागरिकांचे नुकसान होईल, असे म्हटले आहे.
व्यापाऱ्यांची वाहनेच अधिक
कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचीच वाहने अधिक असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना तासनतास उभे राहावे लागते. वास्तविक, शेतकऱ्यांची नोंदणी ऑनलाइन होते. त्यांना फोन येतो किंवा मेसेज येतो, की तुमचा कापूस अमूक दिवशी मोजला जाईल. या वेळेत या दिवसभरात कापूस मोजणे अपेक्षित असताना शेतकऱ्यांना तीन-तीन दिवस कापूस मोजण्याची वाट पाहवी लागते. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
संपादन ः राजेश सोनवणे