esakal | आमदारांत रस्सीखेच;ब्रेक टेस्ट ट्रॅक सेंटर भडगाव की चाळीसगावात?
sakal

बोलून बातमी शोधा

brake test track

आमदारांत रस्सीखेच;ब्रेक टेस्ट ट्रॅक सेंटर भडगाव की चाळीसगावात?

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव: वाहन परवान्यासह (Vehicle licenses) ब्रेक टेस्ट ट्रॅक (Brake test track) व अन्य कामासांठी जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागत असल्याने त्यासाठी कायमस्वरूपी केंद्र प्रस्तावित असून, ते भडगावात होते की चाळीसगावात, याबाबत किशोर पाटील (MLA Kishor Patil) व मंगेश चव्हाण ( MLA Mangesh Chavan)यांच्यात चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. दोघा आमदारांनी त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. सद्यःस्थितीत हे केंद्र भडगावात प्रस्तावित आहे.

(jalgaon rto brake test track center two mlas struggle)

हेही वाचा: शेतरस्त्याच्या वादातून भावानेच भावावर केला गोळीबार


पंधरा तालुक्यांचा जिल्हा असलेल्या जळगाव जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाची गरज आहे. मात्र, हे कार्यालय धुळे येथे आहे. जळगावात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आहे. मात्र, वाहन नोंदणीसह परवाना, ब्रेक टेस्ट यांसह व्हेईकल फिटनेससारख्या चाचण्या, तपासण्यांसाठी चाळीसगावपासून मुक्ताईनगरपर्यंत, जामनेरपासून चोपड्यापर्यंत, रावेरपासून अमळनेरपर्यंत अशा सर्वच दूरच्या तालुक्यांमधील वाहनधारकांना जळगावला यावे लागते. विशेष म्हणजे चाळीसगाव तालुक्यातील वाहनधारकांना, तर थेट १०० पेक्षा अधिक किलोमीटर जळगावला यावे लागते.


तालुक्याच्या ठिकाणी केंद्र
वाहन परवाना व नोंदणीसाठी तालुक्यांच्या ठिकाणी शिबिरे घेतली जातात. मात्र, एखाद्या तालुक्याच्या ठिकाणीच ब्रेक टेस्ट ट्रॅक व अन्य सुविधा केंद्र उपलब्ध झाल्यास वाहनधारकांची सोय होईल त्यामुळे अशी केंद्र प्रस्तावित असतात. सध्या भडगावात अशा प्रकारचे केंद्र होऊ घातले असून, त्यासाठी आमदार किशोर पाटील प्रयत्नशील आहेत. भडगाव हे पाचोरा, पारोळा, चाळीसगाव, एरंडोल अशा चार-पाच तालुक्यांच्या मध्यभागी असल्याने सर्वदृष्टीने ते योग्य असल्याने याठिकाणी केंद्र होण्याची शक्यता आहे.


चाळीसगावचीही मागणी
भडगावात ब्रेक टेस्ट ट्रॅक व अन्य सुविधांचे केंद्र प्रस्तावित असताना चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांनीही हे केंद्र चाळीसगावातच करण्यात यावे, असा आग्रह धरला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी याबाबत नुकतीच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्‍याम लोही यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यासाठी चाळीसगावात पाच-सात एकर जागाही उपलब्ध करून देऊ, असे चव्हाण यांनी आश्‍वस्त केले आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील बहुतांश तालुके कोरोनामुक्तीकडे


दोन्ही आमदारांत रस्सीखेच
त्यामुळे आता शिवसेना आमदार किशोर पाटील व भाजपचे मंगेश चव्हाण यांच्यात केंद्र मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. दोघांनी त्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. या दोन्ही तालुक्यांच्या ठिकाणचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल. जिल्हाधिकारी त्याबाबत परिवहन मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करून त्यासंबंधी निर्णय होईल. त्यामुळे आता यात कोणते आमदार बाजी मारतात, याकडे लक्ष लागले आहे.


चाळीसगाव, भडगाव, पाचोऱ्यासह पारोळा, एरंडोल येथून वाहन परवाना व अन्य तपासण्यांसाठी जळगावला येणे कठीण जाते. त्यामुळे या चार-पाच तालुक्यांचा मध्यभाग असलेल्या भडगावला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यासंबंधी सुविधा केंद्र प्रस्तावित असेल, तर ते भडगावला असणे सोयीचे राहील.
- किशोर पाटील, आमदार (पाचोरा)

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘अनलॉक’ नाहीच!


चाळीसगाव शहर व तालुका मोठा आहे. तालुक्याची हद्द थेट धुळे, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यांपर्यंत असल्याने तेथून नागरिकांना जळगाव अथवा भडगावला येणेही कठीण आहे. त्यामुळे हे सुविधा केंद्र चाळीसगाव येथेच व्हायला हवे, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
- मंगेश चव्हाण, आमदार (चाळीसगाव)

loading image
go to top