‘आरटीओ’ने अंगीकारली डिजिटल आत्मनिर्भरता ; ऑनलाईन सुविधा देण्यावर भर

रईस शेख
Wednesday, 12 August 2020

प्रत्येकाकडे अँड्राइड मोबाईल असून, त्याद्वारे शासकीय फी, दंड अशा आर्थिक देवाणघेवाणीचे जो-तो स्वतःच करून घेतोय.

जळगाव : लायसेन्स (चाचणी वगळता) किंवा वाहनांशी संबंधित कामासाठी नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) येण्याची आवश्यकता नाही. पेपरलेस वर्क, ऑनलाइन सेवा-सुविधांचा वापर वाढविल्याने कार्यालयाची पायरी चढण्याची गरजच राहिलेली नाही. डिस्ट्रिब्यूटर, वाहनधारक या डिजिटायझेशनमुळे स्वतः आत्मनिर्भर झाले असून, कोरोना काळात याचा प्रचंड फायदा या विभागाला करून घेता आला. 

एप्रिल ते ऑगस्टदरम्यान मोजकेच काही दिवस वगळता कार्यालयाचे काम सुरळीत सुरू आहे. ऑनलाइन कामावर भर दिला. जास्तीत जास्त कामे ऑनलाइन आणि उपलब्ध सुविधांचा वापर करून झाली. राज्य शासनानेही लायसेन्स नूतनीकरणापासून ते कुठलेही कर व दंड भरण्याची सुविधा ऑनलाइन असल्याने कामात गतिमानता येऊन भ्रष्टाचार आणि दलालांची लूटमारही थांबली आहे. प्रत्येकाकडे अँड्राइड मोबाईल असून, त्याद्वारे शासकीय फी, दंड अशा आर्थिक देवाणघेवाणीचे जो-तो स्वतःच करून घेतोय. डिजिटयझेशन आणि ऑनलाइन सुविधेमुळे तत्काळ सेवेसह आत्मनिर्भरता कार्यालयाने अंगीकारली आहे. 

या कामासाठी यावे लागते 
नवीन लायसेन्स काढणे किंवा वाहनांची फिटनेस टेस्ट आणि वाहन हस्तांतर केवळ याच कामांसाठीच कार्यालयात यावे लागते. तेही दिलेल्या तारखेलाच अर्जदारांना आरटीओ कार्यालयात उपस्थित राहावे लागते. सुरक्षित अंतर ठेवत संबंधित अधिकारी ऑनलाइन अपलोड कागदपत्रांच्या सत्यप्रतींची पडताळणी करतात. 

सूचनांचे आदानप्रदानही डिजिटली 
वरिष्ठ कार्यालयाकडून तीन महिन्यांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका झाल्या. जळगाव कार्यालयात सूचनांच्या आदानप्रदानासाठी अधिकारी-कर्मचारी व्हॉट्सॲप ग्रुपवर सक्रिय आहेत. कार्यालयीन कामाचे सर्वेक्षण अधिकृत वेबसाइटद्वारे कुठलेही वरिष्ठ करू शकतात. कार्यालयाचे आवार आणि कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज असून, अप्रिय प्रकार रोखण्यासह आपल्यावर निगराणी ठेवली जात असल्याचे सर्वांनाच माहीत असल्याने गैरप्रकारांनाही आळा बसला आहे. 

कुठलाही दंड, परवाने फी, नोंदणी अशी कामे ऑनलाइन पद्धतीनेच केली जात आहेत. यामुळे कामात सुसूत्रता आणि पारदर्शकतेसह उपलब्ध संख्याबळात गतिमानता आली आहे. परिवहन सेवा, सारथी ॲपमुळे राज्य व देशातील कुठल्याही आरटीओ कार्यालयाची माहिती सहज एका क्लिकवर उपलब्ध आहे. ऑनलाइन कामकाजामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आणि सर्वांत महत्त्वाचे सामान्य जळगावकर यातून आत्मनिर्भर झाला आहे. 
-श्‍याम लोही, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय  

 

संपादन-भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon RTO office transparency of paperless management with online services