वाढदिवसाचा बहाणा..कट्टर विरोधकांचा ‘दोस्तांना’; दिलजमाई खरी की खोटी 

कैलास शिंदे
Sunday, 13 December 2020

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या नेतृत्वाची छाप माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी खासदार ईश्‍वरलाल जैन व माजी आमदार संतोष चौधरी यांनी पाडली आहे. प्रत्येकाने आपापल्या पक्षासाठी कार्य केले आहे.

जळगाव : राजकारणात कुणी कुणाचा फार काळ मित्र आणि शत्रू नसतो, असे म्हटले जाते. याची प्रचीती राजकीय व्यासपीठावर अनेक वेळा दिसून आली आहे. तीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावरही शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिसून आली. एकेकाळी कट्टर विरोधक असलेले एकनाथ खडसे, माजी खासदार ईश्‍वरलाल जैन व माजी आमदार संतोष चौधरी शनिवारी (ता. १२) एकमेकांना केक भरविताना दिसून आले. 
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या नेतृत्वाची छाप माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी खासदार ईश्‍वरलाल जैन व माजी आमदार संतोष चौधरी यांनी पाडली आहे. प्रत्येकाने आपापल्या पक्षासाठी कार्य केले आहे. ईश्‍वरलाल जैन व संतोष चौधरी यांचा पक्ष एकच होता. एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षात होते. मात्र जैन व चौधरी यांच्यात पक्षांतर्गत वाद होताच अनेक वेळा तो दिसूनही आला आहे. तर खडसे विरोधक असल्यामुळे जैन व चौधरी यांच्याविरुद्ध राजकीय वाद होता. 

जैन– खडसेंची काट्याची लढत
जैन आणि खडसे यांचे मतदारसंघ वेगळे आहेत. त्यामुळे मतदारसंघात त्यांची आमनेसामने लढत झाली नाही. मात्र जिल्हा बँकेत दोघांनी एकमेकांविरुद्ध पॅनलच्या माध्यमातून काट्याची लढत दिली आहे. या काळात त्यांचे एकमेकाविरुद्ध आरोप- प्रत्यारोप झाले आहेत. तर निवडणुकांमध्ये आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना त्यांनी शाब्दिक प्रहारही केले आहेत. 

अन्‌ बांधली जायची राजकीय गणिते
खडसे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांचा भुसावळ पालिका निवडणुकीत नेहमीच काट्याचा सामना झाला आहे. दोघांनीही आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. भुसावळ पालिका निवडणूक एक राजकीय रणभूमीच असायची. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असायचे, एवढेच नव्हे, तर त्यावर जिल्ह्यातील राजकीय गणितेही बांधली जात होती. 
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता राजकीय रंगही बदलला आहे. एकमेकांविरोधात असलेले तीनही नेते आजही एकाच पक्षात आले आहेत. 

मैत्रीपर्वाची सुरवात
खडसे यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर तीनही नेते आजपर्यंत एकाच व्यासपीठावर आले नव्हते. आज मात्र पक्षाचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात तीनही नेते एकाच ठिकाणी आले, एवढेच नव्हे, तर त्यांनी एमेकांना केकही भरविला. त्यामुळे शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त या नेत्यांचे एकीकरण झाले. यानिमित्त त्यांचे मैत्रीपर्व सुरू झाले आहे. आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात ‘दोस्तांना’ काय चमत्कार घडविणार, हे दिसून येईल. भुसावळ पालिका आणि जिल्हा सहकारी बँक निवडणुकीचे ‘घोडामैदान’ जवळच आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon sharad pawar birthday friends of staunch opponents