बीएचआर प्रकरण : ठेवी परत मिळण्याच्या आशेला धक्का !

बीएचआर प्रकरण : ठेवी परत मिळण्याच्या आशेला धक्का !

जळगाव : बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा उचलल्यानंतर आतापर्यंत ठेवीदारांना मिळत असलेली तीस-चाळीस टक्के रक्कम मिळणेही दुरापास्त होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. ठेवीदारांना त्याबाबत चिंता असून, कारवाईअंती तरी न्याय मिळावा, अशी अपेक्षा ठेवीदारांमधून व्यक्त होत आहे. 
मल्टिस्टेट भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्थेतील बेकायदा कर्जवाटप व गैरव्यवहारप्रकरणी संचालकांवर गुन्हे दाखल आहेत, त्यांना अटकही झाली आहे. संस्था अवसायनात काढून शासनाने अवसायक नियुक्त केले; पण त्या अवसायकानेही गैरव्यवहार करून ठेवीदारांचीच लूट केली. 


आर्थिक गुन्हे शाखेचे पाऊल 
तीन आठवड्यांपूर्वी राज्य गृह विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई सुरू केली. ठेवीदार संघटनेचा अध्यक्ष विवेक ठाकरे, सीए धरम सांखला, सीए महावीर जैन यांना अटक करण्यात आली. अवसायक जितेंद्र कंडारे, व्यावसायिक सुनील झंवर हे अद्याप फरारी आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने संस्थेचे कार्यालय, झंवर व ठाकरेचे कार्यालयही सील केले. या कारवाईतून आणखी तथ्ये बाहेर येण्याची शक्यता आहे. 

अवसायकाने दलालांच्या मदतीने संस्थेच्या व संचालकांच्या जप्त मालमत्ता कवडीमोल किमतीत विकल्या, तसेच ठेवींच्या पावत्याही बेकायदेशीरपणे ‘मॅच’ करण्यात आल्या. अशा मुख्य कारणांमुळे ही चौकशी सुरू झाली. 

ठेवींची रक्कम कशी मिळणार? 
अवसायकाची नियुक्ती झाल्यापासून म्हणजे २०१५पासून ठेवींच्या पावत्यांपोटी ठेवीदारांना २० ते ४० टक्क्यांपर्यंतची रक्कम देण्यात येत होती. परंतु आता आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर ही प्रक्रियाही थांबली आहे. या रकमा पुढे मिळतील का, असा प्रश्‍न ठेवीदारांमधून उपस्थित होत आहे. 

कारवाईचे स्वागतच पण... 
आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केलेल्या कारवाईचे ठेवीदार स्वागतच करीत आहेत. पण ही कारवाई शेवटच्या ठेवीदाराला न्याय मिळवून देण्यापर्यंत पूर्ण करावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. 


ज्यांनी ठेवीदारांची रक्कम लुटली, त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहेच; पण त्यातून ठेवीदारांच्या रकमा देऊन त्यांना न्याय मिळत असेल तरच कारवाईचा उपयोग आहे. 
-जे. एस. पाटील (ठेवीदार)  

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com