मध्यरात्रीची वेळ...छतावरून अंगावर पडला कोब्रा अन्‌ सुरू झाली जीवन- मरणाची लढाई ​

Serpent friend
Serpent friend

जळगाव : पावसाने दडी मारली असली तरी पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने साप बाहेर निघत आहेत. जमिनीतून बाहेर येवून मिळेल तेथे कोपऱ्यात सर्प लपून बसतात. घरात देखील साप येण्याचे प्रकार या दिवसात पाहण्यास मिळतात. असाच प्रकार खंडेरावनगर परिसरात घडला असून यातून एका सर्पमित्राला नागाने केलेल्या दंशामुळे जीवन- मरणाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. पण सर्पमित्राच्या जिद्दीने मृत्यूलाही जिंकले. असाच अनुभव सोबतच्या सहकाऱ्यांना मध्यरात्री आला. 

अन्‌ कोब्रा खाली आला 
छतावर नाग आहे म्हणून आधीच भयभीत झालेल्या परिवारात भिती आणि कुतूहल दिसून येत होते. तरी गर्दी पांगवून हातात स्नेक स्टिक, सुरक्षा साहित्य घेऊन रवींद्र भोई आणि त्यांच्या मागे सहकारी विक्की घरात गेले. त्याच वेळी घात झाला; पत्र्यावर चढलेल्या तरुणांच्या हालचालीमुळे कोब्रा पसार होण्यासाठी सरकला आणि सरळ खाली पडला; तो नेमका भोई यांच्या अंगावरच. अचानक काय पडले हे बघत त्याला दूर करतांना काही कळायच्या आतच कोब्राने त्यांच्या अंगठ्याजवळ दंश केला. ज्या ठिकाणी कोब्रा पडला तिथे काही क्षणापूर्वी महिला, मुले होती जर वेळीच त्यांना बाहेर काढले नसते तर वेगळीच दुर्घटना घडली असती. 

तरीही कोब्राला केले मुक्‍त 
सर्पमित्र म्हणजे सापाला जीवंत पकडून त्याला जंगलात किंवा रानात सोडत असतात. अशात विषारी जातीच्या नागाने रात्रीच्या वेळी हाताला दंश केला. यानंतर देखील तात्काळ कोब्रा पकडून भोई यांनी सहकारी विक्कीमार्फत निसर्गात मुक्त देखील केला. या दरम्यान भोई यांनी आपण वाचणारच ही जिद्द मनात कायम ठेवत प्रथमोपचार सुरु ठेवले आणि सहकारी सर्पमित्र जगदीश बैरागी यांना घटना कळवली. 

सिव्हीलमधून खासगी अन्‌ पुन्हा सिव्हील 
जगदीश बैरागी यांनी भोई यांना तात्काळ उपचारासाठी सोबत घेत संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, बालकृष्ण देवरे, ऋषी राजपूत, निलेश ढाके यांना कळविले. रवींद्र फालक यांनी अवघ्या पाच मिनिटात सिव्हिल गाठले. सिव्हिलला फक्त कोरोना रुग्णांवर उपचार होतात, असे सांगत त्यांना गेटवरूनच परत पाठविण्यात आले. इतर सहकारी भोई यांना घेऊन शाहू महाराज रुग्णालयात पोहचले. तिथे फक्त एक रखवालदार होता. इथे कोणीच नाही म्हणून थांबून फायदा नाही; उपचार होणार नाही असे उत्तर मिळाल्यावर भोई यांना शहरातील अश्विनी हॉस्पिटल गाठले. ते देखील बंद होते. डॉक्‍टरांनी येण्याची तयारी दर्शविली पण परिस्थिती बघता तितका वेळ नसल्याने दुसऱ्या खासगी रूग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. पण तिथे देखील गेटवरच नकार मिळाला जागा नसल्याने पेशन्ट ऍडमिट करणार नसल्याचे सांगितले. आयसीयूमध्ये बेडच शिल्लक नाही, असे उत्तर गेटवरच मिळाले. त्यात अजून दहा मिनिट गेले. दंश होऊन 35 मिनिटे झाल्यामुळे सर्प विष प्रभाव दाखवायला लागले होते. मळमळ, चक्कर यायला सुरुवात झाली. शेवटी जनरल वार्डला जाण्यासाठी निघाले असता फालक यांचा कॉल आला की सिव्हिलला काम झाले आहे, ताबडतोब या. पुढील पंधरा मिनिटात सिव्हिलमध्ये भोई यांना दाखल केले. इथे पण कर्मचारी ऍडमिट करून घ्यायला तयार नव्हते. शेवटी डॉ. बिराजदार आणि डॉ. गायकवाड यांच्याशी बोलणं करून दिल्यावर पाच मिनिटांनी उपचार सुरू केले. ठराविक वेळेत नर्स, डॉक्‍टरांची व्हिजिट होत राहिली पहाटे चारपर्यंत रुग्ण पूर्वस्थितीत येण्यास सुरुवात झाली. अन्‌ सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. भोई यांना पुढील उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या कठीणप्रसंगी संस्थेचे रवींद्र सोनवणे, राजेश सोनवणे, योगेश गालफाडे, राहुल सोनवणे, विकास भोई, जितेंद्र भोई डॉ खुशाल जावळे यांनी सहकार्य केले 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com